Rains Disrupt Life: घोडेगाव व आदिवासी भागात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; घोडनदी-बुब्रानदीला पूर, डिंभे धरण साठ्यात १२ दिवसांत १२ टक्के वाढ
esakal July 06, 2026 08:45 PM

घोडेगाव : काल व आज दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे घोडेगाव परिसरातील व आदिवासी भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. घोडनदी व बुब्रानदीला पूर आल्यामुळे डिंभे धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात होत आहे. सकाळी ६ वाजता धरणात २.७६ टीएमसी पाणी साठा (१४.१३ टक्के) झाला आहे.

चातकासारखी वाट पाहणारे नागरिक आता मुसळधार पावसामुळे हातबल झाले आहेत. आदिवासी भागातील ओढे नाले भरुन वाहत आहेत. खाचरे तुडुंब भरली आहेत. आहुपे, भिमाशंकर व पाटण खोऱ्यात ही गेली दोन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. भात रोपे तरारली आहे. घोडेगाव परिसरातील नारोडी, लांडेवाडी, शिंदेवाडी, धोंडमाळ, गोनवडी, गिरवली, चिंचोली या बागायती पट्ट्यात भुईमुग या पिकांचे नुकसान झाले आहे. जनावरांचे खाद्य पाण्यात गेल्याने ओला चारा जनावरांसाठी मिळणे कठिण झाले आहे.

डिंभे धरण क्षेत्रात मागील २४ तासात ८५ मिलीमिटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. १२ दिवसात धरण साठ्यात १२ टक्के वाढ झाली आहे. नायब तहसिलदार सचिन वाघ म्हणाले, घोडनदीला मोठा पूर आला आहे. कोणत्याही वेळी पाणी वाढू शकते. शेतकरी व नागरीक यांनी काळजी घ्यावी. गावातील ग्रामपंचायत यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवावे.

सहाय्यक पोलिस निरिक्षक सागर पवार म्हणाले, शिनोली जवळील वाल्मिकीवाडी ते गोहे बुद्रुक येथील रस्ता खचला असल्यामुळे तो बंद करण्यात आला आहे. पोलिस नदिकाठी व पूरावर गस्त घालून लक्ष ठेवत आहे.

मंडलनिहाय पाऊस सकाळी ७.३० वाजता पडलेला पाऊस पुढील प्रमाणे -

  • निरगुडसर - ६०.०० मिली मिटर

  • घोडेगाव - ८०.०० मिली मिटर

  • मंचर - ६१.०० मिली मिटर

  • कळंब - ५७ मिली मिटर

  • पारगाव - ६० मिली मिटर

  • आंबेगाव - ८५.०० मिली मिटर

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.