Mumbai Rains: मुसळधार पाऊस व भरतीचा तडाखा: वसई-नालासोपारा-विरार रेल्वे ट्रॅक पाण्याखाली, लोकल व लांब पल्ल्याच्या गाड्या ठप्प
esakal July 06, 2026 08:45 PM

विरार : रेल्वे हि मुंबई,वसई विरार करांची लाईफ लाईन मानली जाते . परंतु आज हि लाईफलाईन रेल्वे ट्रॅकवर पाणी आल्याने ठप्प झाल्याचे चित्र दिसत होते. गेल्या आठवडा भरापासून सुरु असलेल्या पावसाने आज रौद्र रूप दाखवले सकाळ पासून मुसळधार कोसळणारा पाऊस आणि त्यात समुद्राला आलेली भरती यामुळे रेल्वे ट्रक हि पाण्याखाली गेल्याने पश्चिम रेल्वेवरील लोकलसह लांब पल्ल्याच्या गाड्याची वाहतूक ठप्प झाली आहे.

आठवडा भरापासून कोसळणाऱ्या पावसाने शहरात आणि गावठी हा हा कार माजवला असताना आज सकाळ पासून भरतीच्या वेळेत कोसळणाऱ्या पावसाचा फटका पश्चिम रेल्वेला हि बसला आहे. वसई,नालासोपारा,विरार रेल्वे स्थानकात गुढगाभर पाणी साचल्याने रेल्वे रूळ पाण्याखाली गेल्याने लोकलसेवा बंद झाली आहे. तर दुसर्या बाजूला लांबपल्ल्याच्या गाद्यांनाहीची याचा फटका बसला आहे. विरारच्या पुढे सफाळा ,पालघर रेल्वे स्थानकाठी ट्रॅकवर पाणी आल्याने गाड्या पुढे जाऊ शकत नसल्याचा फटका प्रवाश्याना बसला आहे. आज रेड अलर्ट देण्यात आला असतानाही कामावर जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांना रेल्वे स्थानकातून कमरेभर पाण्यातून पुन्हा घर गाठावे लागले आहे. अनेक लोकल ह्या ट्रकवरच उभ्या आहेत त्याच प्रमाणे विरार स्थानकात बडोदा एक्सस्प्रेस हि गाडी उभी आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाश्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाल्याचे चित्र दिसत आहे.

शहरात ठिकठिकाणची वीज गेली असल्याने नागरिकांना काळोखात बसावे लागले आहे. त्याच प्रमाणे वीज नसल्याने मोबाईल हि चार्ज न केल्याने बंद पडले आहेत. तर दुसऱ्या बाजूला इंटरनेट सुविधा बंद पडल्याने कोणाशी संपर्क हि करता येत नसल्याने घराबाहेर असलेल्या नातेवाईकाची काळजी घरात असलेल्याना लागून राहिली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.