लोणी काळभोर : जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला अवघे काही दिवस शिल्लक असताना पुणे-सोलापूर महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था कायम असल्याने वारकरी, वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. महामार्गाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडेटं गेल्यानंतरही पालखी मार्गाच्या दुरुस्तीबाबत कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज हिरामण काकडे यांनी प्रशासनाला दोन दिवसांचा अल्टिमेटम देत, कामे पूर्ण न झाल्यास लोकप्रतिनिधी व नागरिकांसह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
काकडे यांनी सांगितले की, पालखी मार्गासाठी शासनाकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होतो. मात्र प्रत्यक्षात महामार्गावर मोठमोठे खड्डे, उखडलेल्या साईडपट्ट्या, तुटलेल्या सुरक्षा जाळ्या, चिखलमय सेवा रस्ते, वाढलेली काटेरी झाडे-झुडपे आणि साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे वारकऱ्यांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. "अधिकारी केवळ पाहणीचे दिखावे करतात; प्रत्यक्षात परिस्थितीत कोणताही बदल होत नाही," असा आरोपही त्यांनी केला.
७ जुलै रोजी देहू येथून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान होणार असून, लाखो वारकरी पायी पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहेत. ग्रामीण भागातील पहिला मुक्काम लोणी काळभोर-कदमवाकवस्ती येथे असताना स्वागतासाठी सज्ज असायला हवा असलेला पुणे-सोलापूर महामार्ग मात्र आजही विद्रूप अवस्थेत आहे. खड्डे, रस्त्यावर पडलेली खडी, चिखल, कचऱ्याचे ढिगारे आणि वाढलेली अतिक्रमणे यामुळे वारकरी आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
हडपसर, शेवाळवाडी, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, सोरतापवाडी, कुंजीरवाडी आणि उरुळी कांचन परिसरात पावसाचे पाणी साचल्याने दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पादचाऱ्यांना रस्त्याच्या मधोमध चालावे लागत असल्याने अपघाताचा धोका वाढला असून वाहतूक कोंडीही गंभीर बनली आहे.
"प्रशासनाने कागदी बैठका आणि पाहणी दौरे न करता तातडीने प्रत्यक्ष कामे सुरू करावीत. अन्यथा लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी जनतेच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले जाईल," असा स्पष्ट इशारा सभापती युवराज काकडे यांनी दिला.