ती एक चूक अन् बँक बॅलन्स होईल झिरो, SBI च्या ग्राहकांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी
Tv9 Marathi July 06, 2026 08:45 PM

स्टेट बँक ऑफ इंडिया हा भारतातील सर्वात मोठी बँक आहे, या बँकेचे 52 कोटींपेक्षा जासत ग्राहक आहेत. तुमचेही खाते SBI मध्ये असेल किंवा तुम्ही SBI चे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण सध्या एसबीआयचे ग्राहक सायबर गुन्हेगारांच्या निशाण्यावर आहेत. त्यामुळे तुमच्याकडून झालेली एक छोटीशी चूक किंवा निष्काळजीपणाही महागात पडू शकतो. कारण सायबर फसवणूक करणारे रिवॉर्ड पॉइंट्स रिडीम करण्याच्या नावाखाली बनावट संदेश पाठवून लोकांची आर्थिक फसवणूक करत आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

स्कॅमर्सची कशी फसवणूक करतात?

इतर अनेक बँकांप्रमाणेच स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे व्यवहार केल्यावर काही रिवॉर्ड पॉइंट्स देते. या पॉइंट्सचा वापर मोबाईल रिचार्ज, ऑनलाइन शॉपिंगसह विविध सेवांसाठी करता येतो. मात्र, हे पॉइंट्स दोन वर्षांपर्यंत वापरले नाहीत तर एक्सपायर होतात. ग्राहकांमध्ये या रिवॉर्ड पॉइंट्सबाबत मोठे आकर्षण असल्याने, स्कॅमर्स याचाच गैरफायदा घेत असल्याचे समोर आले आहे. ते ग्राहकांना बनावट संदेश पाठवून रिवॉर्ड पॉइंट्स रिडीम करण्याचे आमिष दाखवतात आणि काही क्षणांतच बँक खाते रिकामे करण्याचा प्रयत्न करतात.

व्हायरल मेसेज मागील सत्य काय?

सरकारची तथ्य पडताळणी करणारी संस्था पीआयबी फॅक्ट चेकने अशा प्रकारचे संदेश पूर्णपणे बनावट असल्याचे म्हणत ग्राहकांना त्यापासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. PIB ने स्पष्ट केले आहे की SBI कधीही आपल्या ग्राहकांना SMS किंवा व्हॉट्सअॅपद्वारे कोणतीही लिंक किंवा APK फाइल पाठवून ती डाउनलोड करण्यास सांगत नाही.

Did you also receive a message asking you to download & install an APK file to redeem SBI rewards❓

Beware‼️ #PIBFactCheck

❌@TheOfficialSBI NEVER sends links or APK files over SMS/WhatsApp.

✔️Never download unknown files or click on such links. pic.twitter.com/VyE4RLK7k4

— PIB Fact Check (@PIBFactCheck) July 5, 2026

मात्र अशा प्रकारचे संदेश सायबर गुन्हेगार पाठवतात, याद्वारे ते ग्राहकांची बँकिंग माहिती चोरतात. जर तुम्ही अशी APK फाइल डाउनलोड केली, तर तुमच्या मोबाईलमध्ये मालवेअर इन्स्टॉल होऊ शकतो. हे मालवेअर तुमचा वैयक्तिक डेटा, बँक खात्याची माहिती, OTP आणि इतर संवेदनशील माहिती चोरू शकते. परिणामी, काही मिनिटांतच तुमच्या बँक खात्यातील पैसे गायब होऊ शकतात. त्यामुळे अशाप्रकारचे मेसेज तुम्हालाही आले असतील तर याकडे दुर्लक्ष करा.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.