Portugal vs Spain : स्वप्न तुटले! ख्रिस्तियानो रोनाल्डोचा वर्ल्ड कप प्रवास संपला! पोर्तुगालला माजी विजेत्या स्पेनकडून पराभवाचा धक्का
esakal July 07, 2026 06:45 AM

Portugal vs Spain Cristiano Ronaldo World Cup journey ends : ४१ वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो याचा फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला. २०१०च्या विजेत्या स्पेनने मंगळवारी मध्यरात्री पोर्तुगालवर १-० असा विजय मिळवला आणि रोनाल्डोचे वर्ल्ड कप विजयाचे स्वप्न धुळीस मिळवले. रोनाल्डोच्या चाहत्यांसाठी हा सर्वात मोठा धक्का होता, कारण सहा वर्ल्ड कप स्पर्धा खेळल्यानंतर रोनाल्डो पुन्हा २०३० मध्ये खेळताना दिसेल, याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूमध्ये गणला जाणाऱ्या रोनाल्डोचे वर्ल्ड कप विजयाचे स्वप्न अधुरेच राहिले.

ख्रिस्तियानो रोनाल्डो आपल्या २७व्या वर्ल्ड कप सामन्यासाठी मैदानावर उतरला. २०१० मध्ये वर्ल्ड कप जिंकल्यानंतर प्रथमच उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्याचे स्पेनचे ध्येय आहे. या सामन्यात सर्वांचे लक्ष दोनच खेळाडूंकडे लागले आहे आणि एक म्हणजे ४१ वर्षीय रोनाल्डो व दुसरा १८ वर्षीय लामिने यमाल... तिसऱ्या मिनिटाला स्पेनकडून मायकेल ओयार्झाबालने पहिला ऑन टार्गेट प्रयत्न केला, जो पोर्तुगालच्या गोलरक्षकाच्या सरळ हातात गेला. त्याच ओयार्झाबालने ८व्या मिनिटाला गोल करण्याची सोपी संधी गमावली... त्याने गोलरक्षकाला चकवले, परंतु तो चेंडूला गोलजाळीची दिशा देऊ शकला नाही. पण, पोर्तुगालच्या बचावफळीसाठी ही धोक्याची घंटा होती. १२व्या मिनिटाला रोनाल्डोचा ऑन टार्गेट प्रयत्न स्पेनच्या गोलीने सहज अडवला.

Neymar Retire: ब्राझीलचे वर्ल्ड कप स्पर्धेतून पॅकअप अन् नेयमारचा धक्कादायक निर्णय! म्हणाला, मी खूप प्रयत्न केले, पण...

१६व्या मिनिटाला पोर्तुगालचा गोलरक्षक डिओगो कोस्टाने काही सेकंदाच्या फरकाने दोन सुरेख गोल अडवले. २३ मिनिटांच्या खेळात स्पेनकडून ५ प्रयत्न झाले, त्यापैकी तीन ऑन टार्गेट होते. ३०व्या मिनिटाला कोस्टाने आणखी एक अविश्वसनीय बचाव करून पोर्तुगालला वाचवले. ३७व्या मिनिटाला रोनाल्डोने अप्रतिम बॅकफ्लिफ मारली होती, परंतु स्पेनचा गोलरक्षक वेळेत जागेवर पोहोचला. ४१ व्या मिनिटाला नुनो मेंडेसचा प्रयत्न गोलपोस्टवर आदळला. पहिला हाफ गोलशून्य राहिला. दोन्ही संघांना गोल करण्याची सुवर्णसंधी मिळाली, परंतु एकतर त्यांना लक्ष्य साधता आले नाही किंवा डियोगो कोस्टा आणि उनाई सायमन यांच्या उत्कृष्ट गोलरक्षणामुळे त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले.

दुसऱ्या हाफमधील पहिली २० मिनिटे चेंडू इकडून तिकडे तुडवण्यातच गेली... फार काही घडत नव्हते आणि त्यामुळे चाहत्यांची निराशा वाढताना दिसली. ५६व्या मिनिटाला पोर्तुगालला धक्का बसला, कारण मेंडेसला दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले. तो असा बचावपटू होता, की ज्याने स्पेनच्या यमालला जखडून ठेवलेले. मेंडेसने गोलची एक संधी निर्माण केली होती,तर ३ यशस्वी टॅकल व ६ यशस्वी बचाव केले होते.

शेवटच्या १० मिनिटाला सामन्यात रंग चढताना दिसला आणि आता पहिला गोल कोण करेल याची उत्सुकता ताणली गेली. सहा मिनिटांच्या भरपाई वेळेच्या पहिल्याच मिनिटाला मिकेल मेरिनोने ( Mikel MERINO) गोल करून स्पेनला १-० अशी आघाडी मिळवून दिली आणि विजयासाठी ती पुरेशी ठरली. शेवटच्या सेकंदाला पोर्तुगालकडून हेडरद्वारे बरोबरीचा गोलसाठीचा प्रयत्न झाला खरा, परंतु तो अयशस्वी ठरला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.