आरामदायक झोपेसाठी मऊ आणि मुलायम गादी आवश्यक असते. पण याच गादीवर बसून जेव्हा तुम्ही तासन तास लॅपटॉपवर काम करता तेव्हा मात्र हीच गादी तुमच्या दुखण्याचे कारण ठरू शकते. कारण मऊ गादी तुमच्या ऑफिस डेस्कच काम नाही करू शकत.
आताच्या डिजिटलच्या काळात अनेक कंपन्या वर्क फ्रॉम होमला प्राधान्य देतात. पण घरातून काम करताना आपण रिलॅक्स मोडमध्ये असतो. अशावेळी ऑफिसप्रमाणे दिवसभर एकाच डेस्कवर किंवा टेबलवर लॅपटॉप ठेवून काम करत नाही. तर आपण बेडवर पाय पसरून मांडीवर उशी घेऊन त्यावर लॅपटॉप ठेवतो किंवा छोटा स्टँडवर लॅपटॉप ठेवत मांडी घालून काम करतो. पण यामुळे शरीराला आराम मिळण्याऐवजी त्रासच होतो.
कारण एकाच जागी मऊ गादीवर तासन तास बसल्याने मणक्याच्या हाडावर दबाव येतो. मान दुखायला लागते. शरीराचे पॉश्चर सरळ ठेवण्यासाठी स्नायूंना ज्यादा मेहनत करावी लागते. खांदे जड होतात. पाय जड होतात. याचे परिणाम तात्काळ दिसत नसले तरी कालांतराने शरीर त्याचे संकेत देऊ लागते.
स्लिप डीस्क, सायटीक आणि मणक्याचे त्रास सुरू होतात.
खांद्यात, हातात, मुंग्या येणे, बोट हात सुन्न होणं. डोकेदुखी ही तुमच्या नसांवर दाब पडत असल्याची लक्षणे आहेत.
यामुळे जर तुम्हीही बेडवर बसून ऑफिसच काम करत असाल तर लक्षात ठेवा की जर तुम्हाला तासापेक्षा जास्त काळ बसून काम करायचे असेल तर शक्यतो बेडवर बसून काम करू नका.
टेबल खुर्चीचा वापर करा.
जर तुम्हाला टेबल खुर्चीवर बसणे शक्य नसेल तर पाठीला आधार देण्यासाठी उशीचा वापर करा.
बेडवर बसून काम करताना लॅपटॉप स्टँडचा वापर करा. नजरेच्या समोर लॅपटॉप स्क्रिन असेल याची काळजी घ्या.
२० -२० मिनिटांनी जागेवरून उठा. जरा फिरा.मान, खांद्याचा व्यायाम करा. स्ट्रेचिंग करा.