धक्कादायक! नांदेड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पत्नीवरच तीन गोळ्या झाडल्या; आरोपी पती फरार, शहरात खळबळ
अभिषेक एकबोटे, एबीपी माझा July 07, 2026 09:43 PM

नांदेड : जिल्ह्याच्या लोहा शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात सोमवारी मध्यरात्री कौटुंबिक वादातून पतीने स्वतःच्या पत्नीवर गावठी कट्ट्यातून तब्बल तीन राऊंड गोळीबार (Firing) केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्राणघातक हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर नांदेड (Nanded) येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, गोळीबारानंतर आरोपी पती घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असून गोळीबाराच्या घटनेतील जखमी पत्नीची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल जाधव आणि त्याची पत्नी अर्चना यांच्यात सोमवारी मध्यरात्री कडाक्याचे भांडण झाले. या वादातून विशालने रागाच्या भरात पत्नी अर्चनावर विनापरवाना गावठी कट्ट्यातून सलग तीन गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी तिच्या कानाला चाटून गेली, तर दुसरी गोळी पाठीत घुसल्याने ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळली, त्यानंतर तिला तातडीने नांदेडला हलवण्यात आले. सध्या तिच्यावर नांदेडमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने पीडित महिला सुरक्षित असून तिची तब्येत सध्या स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, आरोपी पतीवर यापूर्वी 2023 मध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल असून तो सध्या जामिनावर बाहेर होता. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची वेगवेगळी पथके रवाना करण्यात आली असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत

अवैध शस्त्रसाठ्यावर प्रश्न

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. नीलम रोहन आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक आणि फिंगरप्रिंट पथकाने पुरावे संकलित केले आहेत. फरार आरोपी विशालवर यापूर्वी मे 2025 मध्ये पेट्रोल पंप लुटीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना केली आहेत. लोहा शहरात थेट गावठी कट्ट्यातून गोळीबार झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. या घटनेनंतर शहरातील वाढता अवैध शस्त्रसाठा आणि गुन्हेगारीवर पोलीस काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोठी बातमी! नवी मुंबईत बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले; भीषण अपघातात एकाचा मृत्यू

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.