
ज्ञानबा-तुकारामच्या गजरात आषाढी वारी सोहळा भक्तीभावाने मार्गस्थ झाला आहे. पालखी सोहळ्यात लाखो वारकरी ऊन, पाऊस, वारा यांची परवा न करता मैलन् मैल पायी चालतात. असं म्हणतात विठ्ठलाच्या दर्शनाची आस लागलेला भक्त कशाची तमा न बाळगता विठ्ठल विठ्ठल करत चालत असतो. अशावेळी या प्रवासात शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवणे आणि आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. वारीत चालताना तुम्हाला कोणता शारीरिक आजार असेल त्यात तुम्ही तासन् तास चालल्यामुळे शरीरातील पाणी कमी होऊन थकवा येऊ शकतो. म्हणूनच, वारीला निघताना विठ्ठल नामाच्या जपासोबतच बॅगेत ऊर्जा देणारे पदार्थ ठेवणे आवश्यक आहे.
गूळ आणि फुटाणे –
गुळामुळे शरीराला कार्बोहायड्रेट्स मिळतात आणि फुटाण्यांमधून प्रोटीन मिळते. तुम्हाला वारीत चालताना थकवा आल्यास थोडे गूळ-फुटाणे खाल्ल्याने ताकद मिळेल.
खजूर आणि सुका मेवा –
खजूर, बदाम, मनुके बॅगेत ठेवा. खजूर हा ऊर्जेचा उत्तम स्त्रोत असून यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते आणि भूकही भागते.
लिंबू-पाणी आणि ओआरएस –
सतत चालल्याने घामावाटे शरीरातील पाणी आणि क्षार कमी होतात. यासाठी पाण्याच्या बाटलीत ओआरएस पावडर, ग्लुकोज किंवा लिंबू-साखर-मीठ यांचे मिश्रण ठेवावे, ज्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होणार नाही.
लाह्या आणि राजगिरा चिक्की –
पचनास हलक्या असणाऱ्या लाह्या किंवा राजगिरा चिक्की सोबत ठेवा. हे पदार्थ पोट भरलेले ठेवतात.
तज्ज्ञांचा सल्ला-
वारीमध्ये चालताना एकाच वेळी खूप जास्त जेवणे टाळावे. दर दोन ते तीन तासांनी थोडे-थोडे पाणी पीत राहावे आणि ऊर्जेसाठी वरील पदार्थ खावेत. यामुळे पायात गोळे येणे किंवा चक्कर येण्याचा त्रास टळेल.
हेही वाचा – Ashadhi Ekadashi: पाऊले चालती पंढरीची वारी..! यंदा आषाढी एकादशी कधी?