सई ताम्हणकरच्या 'बोल बोल राणी'चं पहिलं गाणं भेटीला; प्रेम, रहस्य आणि भावनांचा 'सुपरनोव्हा'
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क July 08, 2026 05:43 PM

Sai Tamhankar Bol Bol Bol Rani Movie Song: 'बोल बोल राणी'च्या (Bol Bol Bol Rani) दमदार ट्रेलरनं प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण केलेत. प्रत्येक पात्राभोवती असलेले गूढ, रहस्य आणि अनपेक्षित ट्विस्टची झलक पाहिल्यानंतर आता या सिनेमातलं पहिलं गाणं 'सुपरनोव्हा' प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून, सिनेमाच्या भावविश्वाची एक वेगळीच बाजू या गाण्यातून समोर येतेय.

सामान्य प्रेमगीतांच्या चौकटीपलीकडे जाणारं 'सुपरनोव्हा' (Supernova Song) हे गाणं ऐकण्याबरोबरच अनुभवण्यासाठीही आहे. सुपरनोव्हा म्हणजे, एका ताऱ्याच्या विस्फोटातून निर्माण होणारं अफाट तेज. याच भावनेचा धागा पकडत हे गाणं प्रेमाच्या अशा टप्प्याची गोष्ट सांगते, जिथे भावना इतक्या तीव्र होतात की, त्या आयुष्याचा मार्गच बदलून टाकतात. त्यामुळे हे गाणं चित्रपटातील रहस्य उलगडत नाही, पण त्या रहस्यामागील भावनिक विश्वाची झलक नक्कीच दाखवते.

सुझेन डिमोलाच्या भावपूर्ण आवाजानं सजलेलं हे गाणे ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांच्या आगळ्यावेगळ्या संगीतामुळे आणखी प्रभावी ठरते. सावरी वर्मा यांनी लिहिलेल्या शब्दांमध्ये प्रेम, ओढ आणि अनामिक अस्वस्थतेचा सुंदर मिलाफ आहे. गाण्यात सई ताम्हणकर एका विलक्षण भावविश्वात वावरताना दिसते. तिच्या प्रत्येक नजरेत, प्रत्येक हालचालीत काहीतरी अव्यक्त दडलेले आहे. दुसरीकडे सुबोध भावे एखाद्या गुंतागुंतीच्या कोड्याचा मागोवा घेत असल्याची झलक दिसते. त्यामुळे हे गाणे केवळ रोमँटिक न राहाता चित्रपटातील रहस्य आणि भावनिक संघर्ष यांना एकत्र गुंफणारा महत्त्वाचा दुवा आहे. गाण्याची प्रत्येक फ्रेम आणि प्रत्येक स्वर प्रेक्षकांना नकळत त्या गूढ विश्वात आणखी खोल घेऊन जातो.

याविषयी दिग्दर्शक सिड विंचुरकर म्हणतात, "चित्रपटातील प्रत्येक गाण्याचा कथेशी जवळचा संबंध आहे आणि ‘सुपरनोव्हा’ त्यातील सर्वात खास आहे. हे गाणे कथेला थांबवत नाही, तर पात्रांच्या मनात काय सुरू आहे, त्यांच्या भावनांचा उद्रेक किती खोल आहे आणि त्यांच्यातील नात्यांचा प्रवास कोणत्या वळणावर उभा आहे, हे सांगते. ट्रेलरमध्ये ज्या रहस्याची झलक दिसते, त्या रहस्यामागे धडधडणाऱ्या भावनांचा आवाज म्हणजे ‘सुपरनोव्हा’. प्रेक्षकांनी हे गाणे फक्त पाहू नये, तर त्यातील शांतता, अस्वस्थता आणि प्रेमाचा विस्फोट अनुभवावा."

संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र म्हणतात, "'सुपरनोव्हा' हे नाव जितकं वेगळं आहे, तितकाच त्याचा संगीतप्रवासही वेगळा आहे. या गाण्यात आम्हाला पारंपरिक प्रेमगीताचा सूर नको होता. प्रेम जेव्हा माणसाला आतून बदलतं, त्याला अस्वस्थ करतं, त्याच वेळी त्याला नवीन ऊर्जा देखील देतं, त्या भावनेचा ध्वनी आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या गाण्यात शांतताही आहे, धडधडही आहे आणि एक अनामिक गूढताही आहे. कथा पुढे जात असताना या गाण्याचा अर्थ प्रेक्षकांना आणखी खोलवर उमगेल."

ट्रेलरनंतर आता 'सुपरनोव्हा'नं 'बोल बोल राणी'च्या रहस्यमय विश्वाला एक भावस्पर्शी आणि सुरेल आयाम दिला आहे. त्यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखी वाढली असून, पडद्यावर या रहस्याचा उलगडा नेमका कसा होणार याची प्रेक्षकांना आता अधिकच प्रतीक्षा लागली आहे. न्यूझीलंड मोशन पिक्चर्स लिमिटेड निर्मित या चित्रपटाचे निर्माते अपूर्वा मोतिविले सहाय, सिड विंचुरकर आहेत. यश मोदी, शब्बीर सबुवाला, रचना वोरा, तपन विचारे, यश राम शाहानी आणि आयुष कृप्लानी हे सहनिर्माते आहेत. सई ताम्हणकर, सुबोध भावे, चिन्मय मांडलेकर आणि संभाजी ससाणे यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'बोल बोल राणी' हा रहस्य, थरार आणि सस्पेन्सने भरलेला चित्रपट 17 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

पाहा व्हिडीओ : 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.