Nashik Rain: नाशिकमध्ये पावसाचा हाहा:कार, 300 विद्यार्थ्यांना बसला फटका, परिक्षेला न जाता आल्याने आता…
Tv9 Marathi July 08, 2026 06:45 PM

मुंबई, पुण्यानंतर नाशिकमध्ये मुसळधार पावसाचे संकट ओढवलेले पाहायला मिळात आहे. काल हवामान खात्याने नाशिकमध्ये ढगफुटीचा इशारा दिला होता. पालघरमध्ये पूरस्थिती निर्माण करणारा भोवरा नाशिकमध्ये सरकेल, असे भाकीत वर्तवण्यात आलं होतं. परंतु असे काहीच झाले नाही. हा भोवरा वेगळ्याच दिशेने वळलाय, त्यामुळे नाशिकवरील अतिवृष्टीचं संकट टळले असले तरीही पावसाचा कहर काही थांबलेला नाही. आता नाशिकमध्ये मुसळधार पावसामुळे आणि एका बांधकाम स्थळावर झालेल्या भूस्खलनामुळे एक मोठा अपघात आणि वाहतूक कोंडी झाली. या नैसर्गिक आपत्तीचा फटका विद्यापीठाच्या परीक्षांसाठी घरातून निघालेल्या विद्यार्थ्यांना बसला आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे 300 हून अधिक विद्यार्थी वेळेवर परीक्षा केंद्रांवर पोहोचू शकले नाहीत आणि त्यांच्या महत्त्वाच्या परीक्षा चुकल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, संदीप फाउंडेशन कॉलेज, ब्रह्मा व्हॅली आणि सपकाळ कॉलेजसह अनेक संस्थांमधील विद्यार्थी बुधवारी सकाळी 10 वाजता होणाऱ्या त्यांच्या परीक्षांसाठी निघाले होते. मात्र, सततच्या पावसामुळे आणि भूस्खलनामुळे नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला जोडणारा मुख्य रस्ता पूर्णपणे बंद झाला. विद्यार्थी सकाळी 8 वाजल्यापासून प्रचंड वाहतूक कोंडीत अडकले होते आणि सर्वतोपरी प्रयत्न करूनही ते परीक्षा केंद्रांवर पोहोचू शकले नाहीत.

इंजिनिअरिंग आणि फार्मसीच्या विद्यार्थ्यांना मोठा फटका
या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका इंजिनिअरिंगच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना आणि फार्मसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना बसला आहे. सुमारे चार प्रमुख महाविद्यालयांमधील विद्यार्थी वाहनांमध्ये तासंतास अडकून पडल्याने, बुधवारी होणाऱ्या दोन्ही परीक्षा चुकल्या. परीक्षा चुकल्यामुळे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमध्ये मोठ्या प्रमाणावर निराशा आणि संताप पसरला आहे.

परीक्षा चुकलेल्या विद्यार्थ्यांनी आता विद्यापीठ आणि संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांकडे अपील केले आह. त्यांचे म्हणणे आहे की, खराब हवामान आणि रस्त्यांची परिस्थिती पूर्णपणे त्यांच्या नियंत्रणाबाहेर होती. परिणामी, त्यांनी बुधवारच्या दोन्ही परीक्षा रद्द करुन नवीन परिक्षा घेण्याची मागणी केली आहे. सध्या परीक्षांचे पुनर्नियोजन किंवा फेरवेळापत्रक ठरवण्याबाबत विद्यापीठ प्रशासन किंवा स्थानिक प्रशासनाकडून कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नाही.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.