पावसाळ्यात वारंवार पोट का बिघडतं?
Marathi July 08, 2026 04:25 PM

पावसाळा सुरू झाला की सर्दी, खोकला, ताप यासोबत पोटात दुखण्याची समस्या प्रकर्षाने जाणवते. याचे मुख्य कारण म्हणजे पावसाळ्यात हवेत वाढणारी आर्द्रता. ज्यामुळे बॅक्टेरिया, व्हायरस आणि बुरशीची वाढ खूप वेगाने होते. या दिवसांत पाणी आणि अन्न दूषित होण्याचा धोका सर्वाधिक असतो. त्यातच आपली पचनशक्तीदेखील मंदावलेली असते. अशा वेळी बाहेरील उघड्यावरील अन्न खाणे किंवा दूषित पाणी प्यायल्यास गॅस, अपचन, डायरिया आणि फूड पॉयझनिंगसारख्या समस्या लगेच डोके वर काढतात. त्यामुळे या दिवसांत पोट बिघडण्याची नेमकी कारणे कोणती आणि स्वतःला सुरक्षित कसे ठेवावे, हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे.

दुषित पाणी –
पावसाळ्यात पाण्याचे स्रोत लवकर दूषित होतात, ज्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. असे दुषित पाणी प्यायल्यास बाहेरील जंतू हे शरीरामध्ये लवकर जातात आणि पोटाच्या तक्रारी वाढतात. म्हणून पाणी उकळून प्यावे.

मंद झालेली पचनशक्ती –
या ऋतूत शरीराची पचनशक्ती मंदावते. त्यामुळे जड किंवा तेलकट अन्न पचण्यास त्रास होतो.

अन्न विषबाधा –
या दिवसात दमटपणामुळे अन्न लवकर खराब होते. त्यामुळे ताजे अन्न आणि गरम अन्न खाण्यास प्राधान्य द्यावे.

माश्यांकडून होणारा संसर्ग –
उघड्या अन्नावर बसणाऱ्या माश्या हानिकारक जंतू सोडतात, ज्यामुळे पोटदुखी होऊ शकते. म्हणून, अन्न नेहमी भांड्यांनी झाकून ठेवा.

स्ट्रीट फूड –
पावसाळ्यात गरमागरम भजी, चाट किंवा उघड्यावरील खाद्यपदार्थ खाण्याची इच्छा होते. मात्र, दूषित पाणी आणि अस्वच्छतेमुळे हे अन्न पोटाच्या इन्फेक्शनला थेट आमंत्रण ठरते.

पावसाळा एन्जॉय करताना आरोग्याशी तडजोड करू नका. पोटाचा त्रास सुरू झाल्यास स्वतःच्या मनाने औषधे न घेता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

हेही वाचा – रात्रीच्या या सवयींमुळे मिळेल उत्तम झोप

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.