Iran War Live Update: अमेरिकेने आज (8 जुलै) पहाटे शस्त्रसंधीच्या काळात इराणवर हवाई हल्ला केला. यूएस सेंट्रल कमांड (सेंटकॉम) नुसार, अचूक शस्त्रास्त्रांनी 80 हून अधिक लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या तीन जहाजांवरील हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे. वॉशिंग्टनने या हल्ल्यांसाठी इराणला जबाबदार धरले आहे. या हवाई हल्ल्यांमध्ये हवाई संरक्षण प्रणाली, कमांड आणि कंट्रोल सेंटर्स, किनारी रडार, जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, जहाजविरोधी क्षेपणास्त्र प्रणाली, ड्रोन प्रक्षेपण स्थळे आणि आयआरजीसीच्या 60 हून अधिक लष्करी बोटींना लक्ष्य करण्यात आले. इराणी माध्यमांनुसार, सिरिक, केशम बेट आणि बंदर अब्बास येथे अनेक स्फोट झाले आणि काही भागांमध्ये आग लागली.
प्रत्युत्तर म्हणून, इराणी लष्कराने बहरीन आणि कुवेत येथील अमेरिकन लष्करी तळांवरील 85 हून अधिक लक्ष्यांवर हल्ला केल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे, सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांची अंत्ययात्रा नजफमध्ये सुरू आहे. अंत्ययात्रेच्या मार्गावर मोठ्या संख्येने भाविक उपस्थित आहेत खामेनी यांचे पार्थिव मंगळवारी रात्री इराकच्या नजफमध्ये दाखल झाले. इराणमध्ये अनेक दिवस चाललेल्या अंत्ययात्रा आणि धार्मिक विधींनंतर, ही शवपेटी एका विशेष विमानाने नजफमध्ये आणण्यात आली.
बुधवारी बहरीनमध्ये तिसऱ्यांदा हवाई हल्ल्याचे सायरन वाजले. बहरीनच्या गृह मंत्रालयाने याला दुजोरा दिला आणि लोकांना तात्काळ जवळच्या सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याचे व सतर्क राहण्याचे आवाहन केले.