डोंबिवलीत शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी रुग्णालयात डॉक्टर आणि नर्सला मारहाण केल्याची घटना ताजी असताना महाडमधूनही असाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. डोंबिवलीनंतर महाडमध्ये भाजप नगरसेवक आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठा धिंगाणा घातला आहे. महाडमधील पाणी पुरठवड्याच्या प्रश्नावर भाजप नगरसेवक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी महाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना बेदम मारहाण केली. त्यांना त्यांच्या दालनात घुसून मारहाण करण्यात आल्याचे समोर आलं आहे. या घटनेनंतर सत्ताधारी नगरसेवकाच्या विरोधात नगरपरिषदेतदील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी नगरसेवक सूरज बामणे आणि त्यांच्या तीन कार्यकर्त्यांवर महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाडचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर हे दुपारच्या सुमारास नगरपरिषदेच्या दालनात कामकाज करत होते. त्यावेळी नगरसेवक सूरज बामणे आले. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते देखील होते. त्यांनी महाडच्या प्रभाग क्रमांक 6 मधील पाणीपुरवठ्याचा प्रश्नावरवरून मुख्यधिकाऱ्यांशी वाद घातला. त्यानंतर हल्ला करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या दादागिरीनंतर कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नगरसेवकावर कारवाई न झाल्यास कामबंद आंदोलन करू , असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला. मारहाण केल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचे पोलीस तक्रारीत म्हटलं आहे.
तत्पूर्वी, पोलिसांत प्रकरण पोहोचल्यानंतर मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ नगरपरिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कडकडीत निषेध नोंदवला. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी दोन दिवस कामबंद आंदोलनाचा पवित्रा घेतला. बामणे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार झाल्यानंतर काय कारवाई केली जाते, हे पाहावे लागेल.
तत्पूर्वी, डोंबिवलीत शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी डॉक्टर आणि नर्सला मारहाण केल्याने खळबळ उडाली. या प्रकारानंतर विरोधी पक्षातील आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार आगपाखड करत कठोर कारवाईची मागणी केली. त्यानंतर डोंबिवली पोलिसांनी नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अटक केली. म्हात्रे यांच्यासहित त्यांच्या कार्यकर्त्यांवरही गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे. परंतु अटक केल्यानंतर रमेश म्हात्रे यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.