बीडमध्ये ऊसतोड कामगाराला अमानुष मारहाण; अपहरण करुन 4 दिवस छळ, तोंडात लघुशंका केल्याचाही आरोप
विकास माने July 09, 2026 04:13 PM

बीड : जिल्ह्याच्या मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंचाची अमानुष हत्या केल्याची घटना समोर आल्यानंतर बीडमधील (Beed) गुन्हेगारीच्या घटना सातत्याने उघडकीस येत आहेत. अद्यापही बीडमधील गुन्हेगारीला आळा बसत नसल्याचं चित्र दिसून येत आहे. बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील उमापूर येथील ऊसतोड मजूर देविदास कापसे यांचे उचलीच्या पैशासाठी अपहरण करून तब्बल चार दिवस अमानुष छळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उचल परत का देत नाहीस, या कारणावरून मुकादम गणेश थोरात आणि त्याच्या सहकाऱ्यांनी देविदास कापसे यांचे अपहरण केल्याचा आरोप आहे. या घटनेनं पुन्हा एकदा बीडमधील गुन्हेगारी, आणि मुकादमगिरीचा मुद्दा समोर आला आहे. तर, पोलिसांकडूनही (Police) याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याचं दिसून आलं. 

ऊसतोड मजूर देविदास कापसे यांचे अपरहरण केल्यानंतर त्यांना डांबून ठेवत बेदम मारहाण करण्यात आली, तसेच त्यांच्या तोंडात लघुशंका करण्यात आल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला. या घटनेमुळे बीड पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.  देविदास कापसे हे उमापूर येथील रहिवासी असून ऊसतोड मजूर म्हणून काम करतात. उचल परत करण्याच्या कारणावरून त्यांच्यात आणि संबंधित मुकादमामध्ये वाद झाला होता. त्यानंतर मुकादमाने आपल्या सहकाऱ्यांसह देविदास यांचे अपहरण केल्याचे सांगण्या येत आहे. विशेष म्हणजे, चार दिवस त्यांना एका ठिकाणी डांबून ठेवून अमानुष मारहाण करण्यात आली. शारीरिक अत्याचारासोबतच त्यांचा अपमान करण्यासाठी तोंडात लघुशंका करण्यात आल्याचा गभीर आरोपही त्यांचा आहे.

पोलिसांकडून तक्रार दाखल करण्यास नकार

दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक सरपंचांनी मध्यस्थी करत देविदास कापसे यांची सुटका करून त्यांना गावी आणल्याचे सांगण्यात येत आहे. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, मुलाचे अपहरण झाल्यानंतर देविदास यांच्या आईने गेवराई पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी सुरुवातीला त्यांची तक्रार नोंदवून घेतली नाही, असा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला. या आरोपामुळे पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यापूर्वी अनेकदा बीडमधील पोलीस थेट गुन्हेगारांना मदत करण्यात आल्याचंही पाहायला मिळालं आहे. त्यात, काही पोलिसांचे निलंबन आणि बदल्याही करण्यात आल्या आहेत. 

सैराट फेम अरबाज शेखने रडतरडत सगळं सांगितलं, तुकाराम मुंढेंच्या एफडीएने लगेच सोलापूरच्या हॉस्पिटलवर धाड टाकली अन्...

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.