पावसाळ्यात हवेत ओलावा असल्याने हवामान रोगट असते. असे हवामान विषाणूंच्या वाढीसाठी पोषक असते.परिणामी या दिवसात संसर्ग वाढतो. म्हणूनच या दिवसात तब्येतीची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. पावसाळ्यातला साधा सर्दी खोकलाही तुम्हाला न्यूमोनियापर्यंत पोहचवू शकतो. यामुळे यादिवसात होणाऱ्या संसर्गाला हलक्यात घेऊ नये.
ताप
पावसाळ्यात सर्दी खोकला ताप येण ही सामान्य गोष्ट आहे. यामुळे वरील त्रास होताच आपण घरातील तापावरची गोळी घेतो. पण जर गोळी घेतल्यानंतर ४८ तास उलटूनही ताप उतरला नाही, खोकला येत राहीला आणि श्वास घेण्यास त्रास होत असेल , अंगावर लाल चट्टे, आले असतील नाकातून रक्त येत असेल तर तात्काळ हॉस्पिटल गाठावे. कारण डेंग्यू, चिकनगुनिया,मलेरिया, लेप्टोपायरोसिस यासारख्या आजारांची सुरुवात तापानेच होते. यामुळे प्रत्येकवेळी येणारा ताप हा व्हायरलच असेल असे नाही.
पावसाचे पाणी
पावसाळ्याच्या दिवसात रस्त्यांवर पाणी साचते. अशावेळी आपण या साचलेल्या, तुंबलेल्या पाण्यातून सहज चालत जातो. पण या पाण्यामुळे फक्त तुमची चप्पल किंवा बूटच खराब होत नाहीत तर तुमची तब्येतही खराब होऊ शकते. त्यातही जर तुमच्या पायाला जखम असेल, कापले असेल तर या पाण्यातील बॅक्टेरिया जखमेतून तुमच्या शरीरात सहज प्रवेश करतात. यामुळे स्किन इन्फेक्श्नच नाही तर लेप्टोपायरोसिस सारखा गंभीर आजारही होऊ शकतो. ज्यामुळे लिव्हर, किडनी आणि फुफ्फुस निकामी होऊ शकतात. यामुळे पावसाळ्यात घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. जर पायाला जखम असेल तर ती विशेष काळजी घ्यावी . बाहेरून घरी आल्यावर पाय साबणाने स्वच्छ धुवावेत.
डास
पावसाळ्यात घराघरात माशा आणि इतर किटकांबरोबरच डासांचा उपद्रवही वाढतो. पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचते. शिवाय हवेत आद्रता असल्याने वातावरण दमट असते. हे वातावरण डासासारख्या किटकांच्या पोषणास उपयुक्त असते. यामुळे यादिवसात किटकांची पैदास वाढते. मादी डास घरातील फ्लॉवर पॉट, एसी ड्रीप ट्रे, फ्रीजजवळ , कूलर, कुंड्याच्या खाली अंडी घालते. त्यातून डेंग्यू, मलेरियाचा धोका वाढतो. यामुळे यादिवसात घराच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे.
जुने कपडे
पावसाळ्यात घरात कपडे सुकवले जातात. पण त्यामुळे घरात दमटपणा वाढतो. त्यामुळे अस्थमा, एलर्जी, सायनोसायटिस सारख्या समस्या उद्धभवतात. पण जर यादिवसात कपडे सुकवण्यासाठी दुसरा पर्यायच नसेल तर घर बाहेरील हवा येईल हे पाहावे, कपडे वाळत घातलेल्या रुममध्ये फॅन सुरू ठेवावा. त्यामुळे दमटपणा कमी होतो. डिह्युमि़डिफायर ठेवावे.
अँटीबायोटीक
पावसाळ्यात सर्दी , खोकला, ताप असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध गोळ्या घेऊ नयेत. कारण ही औषध डेंग्यू, चिकनगुणिया, इन्फ्लूएंजा किंवा इतर संसर्गात काम करत नाहीत. अशावेळी ताप उतरत नाहीये किंवा फरक पडत नाहीये म्हणून तुम्ही घरातील अँटीबायोटीक खात राहाल तर शरीर अँटीबायोटीकला प्रतिसाद देणेच कमी करते. त्यामुळे उपचारास उशीर होऊ शकतो.