महादेवांना देवाचे देव मानलं जातं. जे भक्त महादेवाची मनोभावे पूजा करतात, प्रार्थना करतात त्यांच्यावर महादेवाची कृपादृष्टी होते. महादेवांच्या आशीर्वादाने भक्ताच्या आयुष्यातील सर्व संकट दूर होतात. परंतु महादेवाची पूजा करण्याचे काही नियम आहेत, अनेकजण महादेवाची पूजा करताना काही छोट्या-छोट्या चुका करतात, त्यामुळे आपल्याला पूजेचं इच्छित फळ मिळत नाही. वास्तुशास्त्रामध्ये महादेवाची पूजा करताना काही नियमांचे पालन करण्यास सांगण्यात आले आहे. आज आपण त्याच नियमांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. देवघरामध्ये नेहमी एकच शिवलिंग असावं, दोन किंवा अधिक शिवलिंग ठेवू नये, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. तसेच तुम्ही देवघरात पूजेसाठी जे शिवलिंग ठेवणार आहात, ते अंगठ्याच्या आकाराएवढं किंवा त्यापेक्षा छोटं असावं, त्यापेक्षा अधिक मोठं शिवलिंग देवघरात नसावं, मंदिरात पूजेसाठी मोठे शिवलिंग ठेवावे, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
पूजेचे नियम – महादेवाची पूजा करताना ती नेहमी शास्त्रोक्त पद्धतीने झाली पाहिजे, असं वास्तुशास्त्र आणि हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. महादेवाची पूजा करताना सर्वात आधी शिवलिंगाला जल अर्पण करावं, त्यानंतर पंचामृताने स्नान घालावे, त्यानंतर पुन्हा पण्याने स्नान घालावे, शिवलिंग स्वच्छ वस्त्राने पुसून कोरडे करावे. त्यानंतर शिवलिंगाला गंध लावावे, शिवलिंगाला पाण्याने स्नान घातल्यानंतर गंध लावणे कधीही विसरू नये असं वास्तुशास्त्र सांगतं. तसेच शिवलिंगाला लाल कुंकवाच्या गंधाऐवजी चंदन आणि हळद मिश्रीत गंध लावावं. त्यामध्ये थोडं कुंकू देखील मिक्स करावं असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. त्यानंतर शिवलिंग देवघरात ठेवावं. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवावी शिवलिंग ज्या जागेवर आहे, त्याच जागेवर ठेवावं, वारंवार त्याची जागा बदलू नये.
पूजा झाल्यानंतर महादेवांना फूलं अर्पण करावीत, परंतु फूलं अर्पण करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी. महादेवांना कधीही लाल फूल अर्पण करू नये, महादेवांना पांढरं फूलच अर्पण करावं, तसेच महादेवांना कधीही तुळसीचं पान किंवा मंजुळा अर्पण करू नये. महादेवांना नेहमी पांढरे फूल किंवा बेलाची पानं वाहावीत. तसेच पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवण्यास कधीही विसरू नये, सोमवारी उपास केल्यास उत्तम असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)