भारत इंग्लंड यांच्यात मालिकेतील चौथा टी20 सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा टीम इंडियाच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात प्लेइंग 11 मध्ये बदल करण्यात आला. पण फलंदाजीत नाही तर गोलंदाजीत हा बदल केला गेला. त्यामुळे संजू सॅमसनला या सामन्यातही बेंचवर बसावं लागलं. सलग तिसऱ्या सामन्यात संजू सॅमसनला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली नाही. तर तीन सामन्यात संधी मिळालेल्या वैभव सूर्यवंशीनेही काही खास केलं नाही. या सामन्यात अभिषेक शर्मासोबत सलामीला आलेल्या वैभव सूर्यवंशीने 10 चेंडूत फक्त 15 धावांची खेळी केली. यात 1 षटकार आणि 1 चौकार मारला. अवघ्या 15 धावांवर बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर बाद होत तंबूत परतला. या मालिकेत जोफ्रा आर्चरने त्याला दुसऱ्यांदा बाद केल्याने त्याची कमकुवत बाजू हाती लागल्याचं बोललं जात आहे.
सामन्याच्या तिसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर इंग्लंडचा स्टार गोलंदाज जोफ्रा आर्चरने वैभव सूर्यवंशीला तंबूचा रस्ता दाखवला. आर्चरने ऑफ स्टम्पच्या किंचित बाहेर टप्पा टाकला. या चेंडूवर मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नात त्याचं नियंत्रण सुटलं. चेंडू बॅटच्या वरच्या भागाला लागला आणि हवेत उडाला. मिड ऑनला क्षेत्ररक्षणासाठी उभ्या असलेल्या सॅम करनने कोणतीही चूक न करता झेल पकडला. त्यामुळे वैभव सूर्यवंशीचा डाव संपुष्टात आला. वैभव सूर्यवंशी सलग तिसऱ्या सामन्यात फेल गेला. या सामन्यात 15 धावा करून बाद झाला. वैभव सूर्यवंशीने पदार्पणाच्या आणि इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात 10 चेंडूत 14 धावा केल्या. त्यानंतर त्याच्या वैयक्तिक दुसऱ्या आणि मालिकेतील तिसऱ्या सामन्यात 5 चेंडूत 13 धावा केल्या होत्या.
जोफ्रा आर्चरचा सामना करणं वैभव सूर्यवंशीला अडचणीचं ठरत असल्याचं दिसत आहे. या मालिकेत आर्चरने सलग दुसऱ्यांदा बाद केलं. मागच्या सामन्यातही आर्चरने वैभव सूर्यवंशीला अडचणीत आणलं होतं. आर्चरच्या आखूड टप्प्याच्या चेंडूवर वैभव बाद होत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे इंग्लंडच्या गोलंदाजांनी त्याची कमकुवत बाजू पकडल्याचं दिसत आहे. विशेष म्हणजे आयपीएल स्पर्धेत वैभव सूर्यवंशी आणि जोफ्रा आर्चर एकाच संघात होते. तेव्हा त्याचं फलंदाजीचं गुपित माहिती असल्याचं जोफ्रा आर्चरने सांगितलं होतं.