Monsoon Update: आयएमडीचा मोठा अंदाज! संपूर्ण देशात मॉन्सून दाखल; १० जुलैनंतर महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी होणार
esakal July 10, 2026 10:45 AM

पुणे : मॉन्सूनने संपूर्ण देश व्यापल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) गुरुवारी जाहीर केले. महाराष्ट्रासह मध्य भारतातील पाऊस दहा जुलैपासून कमी होऊन उत्तर आणि वायव्य भारतातील पावसात वाढ होणार असल्याचा अंदाज ‘आयएमडी’ने वर्तविला आहे.

पश्चिम राजस्थानसह संपूर्ण देश व्यापण्याची मॉन्सूनची सर्वसाधारण तारीख आठ जुलै असून, त्या तुलनेत मॉन्सूनने यंदा एक दिवस उशिरा वायव्य भारत व्यापला आहे. केरळमध्ये चार जूनला आगमन झाल्यापासून सर्वसाधारण वेळेपेक्षा कमी, म्हणजे ३५ दिवसांमध्ये मॉन्सूनचा उत्तरेकडील प्रवास पूर्ण झाला.

या दरम्यान हंगामी वाऱ्यांना जोर नसल्याने सुमारे दोन आठवडे मॉन्सूनची वाटचाल महाराष्ट्रातच रखडली होती. मात्र, पुढे मॉन्सूनचा प्रवाह तीव्र होतानाच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने मॉन्सूनने वेगाने उर्वरित प्रवास पूर्ण केला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.