जगातील पहिले एटीएम स्कॉटलंडचे अभियंता जॉन शेफर्ड-बॅरन यांनी तयार केले. 27 जून 1967 रोजी लंडनमधील एनफिल्ड परिसरातील बार्कलेज बँकेच्या शाखेबाहेर हे पहिले एटीएम बसवण्यात आले. त्या काळात एटीएम ही कल्पनाच लोकांसाठी अगदी नवीन होती. असं सांगितलं जातं की, एकदा जॉन शेफर्ड-बॅरन बँकेत पैसे काढण्यासाठी गेले होते. पण बँक बंद असल्यामुळे त्यांना पैसे मिळू शकले नाहीत. त्याच वेळी त्यांच्या नजरेसमोर चॉकलेट विकणारी व्हेंडिंग मशीन आली. त्या मशीनमध्ये पैसे टाकले की चॉकलेट बाहेर येत असे. ते पाहून त्यांच्या मनात विचार आला – जर मशीनमधून चॉकलेट मिळू शकतं, तर पैसेही का मिळू नयेत? याच विचारातून एटीएमची कल्पना जन्माला आली. (All Photos : Getty Images)
मात्र, एटीएम तयार करणं हीच एकमेव अडचण नव्हती. मशीनला हे कसं कळणार की पैसे काढणारी व्यक्ती खरी खातेदार आहे? यासाठी जॉन शेफर्ड-बॅरन यांनी पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर, म्हणजेच ‘पिन’ची संकल्पना मांडली. ते पूर्वी सैन्यात काम करत असल्यामुळे सुरुवातीला त्यांनी 6 अंकी पिन ठेवण्याचा विचार केला. त्यांना वाटत होतं की जास्त अंक असतील, तर पिन अधिक सुरक्षित राहील आणि तो ओळखणं किंवा फोडणं अधिक कठीण होईल.
पण इथेच एक मजेशीर घटना घडली. त्यांनी हा 6 अंकी पिन आपल्या पत्नी कॅरोलिन यांना लक्षात ठेवायला सांगितला. त्यावर कॅरोलिन म्हणाल्या की, त्यांना सहजपणे फक्त 4 अंकच लक्षात राहतात. 6 अंक लक्षात ठेवणं त्यांच्यासाठी अवघड होतं. पत्नीचं हे मत जॉन शेफर्ड-बॅरन यांनी गांभीर्याने घेतलं. लोकांनाही अशीच अडचण येऊ शकते, हे त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी 6 अंकी पिनचा विचार सोडून 4 अंकी पिनच फायनल केला.
तरीही बँकांनी ग्राहकांच्या सोयीला प्राधान्य दिलं. कारण एटीएममध्ये चुकीचा पिन सलग तीन वेळा टाकल्यास कार्ड तात्पुरतं ब्लॉक होतं. त्यामुळे कोणालाही अंदाजाने पिन शोधणं सोपं नसतं. यामुळे 4 अंकी पिन सुरक्षित आणि वापरण्यासही सोपा मानला गेला.
आज यूपीआय, मोबाईल बँकिंग आणि डिजिटल पेमेंटचा जमाना असला, तरी एटीएम पिनची ही परंपरा अजूनही कायम आहे. तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं, तरी जगभरातील लाखो लोक आजही आपल्या बँक व्यवहारांसाठी त्याच 4 अंकी पिनवर विश्वास ठेवत आहेत. एका साध्या सूचनेतून घेतलेला हा निर्णय आजही जगभरातील बँकिंग व्यवस्थेचा अविभाज्य भाग बनून राहिला आहे.