राजपाल यादव पुन्हा जाणार तुरुंगात; चेक बाऊन्स प्रकरणात उच्च न्यायालयाचा मोठा दणका
abp majha web team July 10, 2026 07:14 PM

Rajpal Yadav: बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव (Rajpal Yadav) यांना चेक बाऊन्स प्रकरणात पुन्हा एकदा मोठा कायदेशीर धक्का बसला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) त्यांच्याविरोधातील दोषसिद्धी कायम ठेवत तीन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे, त्यांच्याविरोधात दाखल असलेल्या सातही चेक बाऊन्स प्रकरणांमध्ये ही शिक्षा लागू करण्यात आली असून सर्व शिक्षा एकाचवेळी भोगाव्या लागणार आहेत. न्यायालयाने राजपाल यादव यांनी वारंवार दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याबद्दलही ताशेरे ओढले. (Cheque Bounce)

1.05 कोटी रुपये भरण्याचे आदेश

कारावासाच्या शिक्षेसोबतच न्यायालयाने राजपाल यादव यांना प्रत्येक प्रकरणात तक्रारदाराला 1.05 कोटी रुपये अदा करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच त्यांची पत्नी राधा राजपाल यादव यांनाही प्रत्येक प्रकरणात 5 कोटी रुपयांहून अधिक दंड भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निकाल देताना न्यायालयाने स्पष्ट केले की, राजपाल यादव यांना थकबाकीची रक्कम भरण्यासाठी आणि तक्रारदारासोबत झालेल्या तडजोडीचे पालन करण्यासाठी अनेक संधी देण्यात आल्या होत्या. मात्र त्यांनी त्या संधींचा योग्य वापर केला नाही.

दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांनी नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ॲक्टअंतर्गत दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर निकाल देताना खालच्या न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. सात चेक बाऊन्स प्रकरणांमध्ये राजपाल यादव यांनी दाखल केलेल्या याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्या.न्यायालयाने प्रत्येक प्रकरणात राजपाल यादव यांना तीन महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. मात्र या सर्व शिक्षा समांतरपणे भोगायच्या असल्याने त्यांना स्वतंत्रपणे प्रत्येक शिक्षेचा कालावधी भोगावा लागणार नाही.

न्यायालयाचे ताशेरे

सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांनी राजपाल यादव यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने म्हटले की, राजपाल यादव आणि त्यांच्या वकिलांनी न्यायालयात अनेक वेळा आश्वासने दिली. त्यांना वारंवार मुदतही देण्यात आली. मात्र त्यांनी न्यायालयासमोर दिलेल्या हमीचे पालन केले नाही.
याच कारणामुळे दोषसिद्धी कायम ठेवत त्यांच्यावरील शिक्षेत हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

2010 मध्ये राजपाल यादव यांनी त्यांच्या निर्मितीतील 'अता पता लापता' या चित्रपटासाठी सुमारे 5 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरल्यानंतर ते कर्जाची वेळेत परतफेड करू शकले नाहीत. त्यानंतर दिलेले अनेक धनादेश (चेक) बाऊन्स झाल्याने त्यांच्याविरोधात न्यायालयीन लढाई सुरू झाली. यापूर्वीही या प्रकरणात राजपाल यादव यांना तुरुंगवास भोगावा लागला होता. त्यानंतर त्यांनी अनेक वेळा थकबाकी फेडण्याचे आश्वासन दिले. मात्र ती आश्वासने पूर्ण न झाल्याने अखेर दिल्ली उच्च न्यायालयाने दोषसिद्धी कायम ठेवत तीन महिन्यांच्या कारावासाचा निर्णय कायम ठेवला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.