माजलगाव - तालुक्यातील वारोळा येथील रहिवासी नवनाथ गणपत पवार यांनी आर्थिक व्यवहारातील लाखो रुपयांची थकीत रक्कम मिळत नसल्याचा आरोप करत ता. 10 शुक्रवारी सकाळी तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष दीपक जगन्नाथ जाधव यांच्या स्वामी विवेकानंद नगर येथील निवासस्थानासमोर विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली तर विष प्रशान केलेल्या नवनाथ पवार यांची प्रकृती चिंताजनक बनल्याने त्यांना संभाजीनगर ला हलवण्यात आले.
तालुक्यातील वारोळा येथील नवनाथ पवार यांनी अनेक वर्षांच्या मैत्री व विश्वासाच्या नात्यामुळे दीपक जाधव यांना मोठी आर्थिक मदत केल्याचा दावा केला आहे. मात्र वारंवार मागणी करूनही संबंधित रक्कम परत मिळाली नसल्याने न्याय मिळावा या मागणीसाठी त्यांनी १५ जूनपासून आपल्या कुटुंबासह जाधव यांच्या घरासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले होते.
यावेळी काही लोकांनी मध्यस्थी करून प्रकरण मिटवले होते. परंतु तरीही जाधव हे पैसे देत नसल्याने शुक्रवारी जाधव यांच्या निवासस्थानासमोर सकाळी नवनाथ पवार यांनी कुटुंबीयांसमवेत येऊन विषारी औषध प्राशन केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र पवार यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यास त्यांच्या कुटुंबीयांनी तीव्र विरोध केला.
'आमची थकीत रक्कम मिळावी, अन्यथा आमचा माणूस मेला तरी हरकत नाही,' अशी आक्रमक भूमिका कुटुंबीयांनी घेतल्याने काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. सुमारे पाऊण तास चाललेल्या गोंधळानंतर महिला पोलिसांच्या उपस्थितीत पोलिसांनी नवनाथ पवार यांना ताब्यात घेऊन बळजबरीने रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.