डोंबिवलीतील महिला डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. रमेश म्हात्रे यांना आता 4 दिवस म्हणजे 13 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आज कोर्टात या प्रकरणी सुनावणी पार पडली, यावेळी रमेश म्हात्रे यांच्यासह इतर तीन आरोपी हजर होते. या तिघांनाही 13 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
कल्याण न्यायालयात पार पडली सुनावणीडोंबिवली महिला डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी कल्याण सत्र न्यायालयात सुनावनी पार पडली. आरोपी रमेश म्हात्रेंसह इतर तीन आरोपींच्या उपस्थितीत कल्याण न्यायालयातील कोर्ट हॉल 6 मध्ये न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग सरन्यायाधीश श्रीमती के एस कातकडे यांच्या दालनात युक्तिवाद पार पडला. आरोपी रमेश म्हात्रे यांचे वकील आनंद पथकी आणि सरकारी वकील आनंद आढसकर यांच्यात युक्तिवाद झाला दोन्ही बाजूंचे म्हणने ऐकूण घेतल्यानंतर के एस कातकडे यांनी म्हात्रे यांच्यासह इतर 3 आरोपींना 13 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
कोर्टाबाहेर गोंधळआज रमेश म्हात्रेला न्यायलयात हजर करताच कोर्टाबाहेर गोंधळ झाला. रमेश म्हात्रे सोबतच्या एका आरोपीवर असलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्याची प्रत घेऊन फिर्यादीचा नातेवाईक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. गुन्ह्याची प्रत घेऊन आतमध्ये सोडण्याची मागणी फिर्यादीच्या नातेवाईकांनी केली. आरोपी विरोधात असलेला विनयभंगाच्या गुन्ह्याची माहिती दंडाधिकाऱ्यांला देण्यासाठी आत सोडा अशी मागणी नातेवाईकांनी केली. मात्र यावेळी बाहेर पोलिस आणि नातेवाईक यांच्यात बाचाबाची झाली.
रमेश म्हात्रेंवर पक्षांतर्गत कारवाई होणार?दरम्यान, न्यायालयाने 4 दिवसांची पोलिस कोठ़डडी सुनावल्यानंतर आता रमेश म्हात्रेंवर आता पक्षांतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे. कारण रमेश म्हात्रे यांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. डॅाक्टर मारहाण प्रकरणी तुमच्या पक्षाने कारवाई का करु नये? अशी विचारणा रमेश म्हात्रे यांना पक्षाकडून करण्यात आली आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. आता एकनाथ शिंदे म्हात्रे यांचा राजीनामा घेतात का ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.