Maharashtra ATS raids: पाकिस्तानस्थित गँगस्टर आणि हँडलर शहजाद भट्टी सोशल मीडिया (व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम) द्वारे भारतीय तरुणांचे ब्रेनवॉश करून त्यांना दहशतवादी कृत्यांसाठी चिथावणी देत आहे. या आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा बिमोड करण्यासाठी महाराष्ट्र एटीएसने (ATS) राज्यभर मोठी चौकशी मोहीम हाती घेतली आहे. एटीएसच्या छत्रपती संभाजीनगर युनिटने मराठवाडा भागातून 15 संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी केली आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील 10 जणांचा समावेश आहे. धाराशिव आणि जालना जिल्ह्यातून दोन आणि बीडमधील एकाचा समावेश आहे.
ताब्यात घेतलेल्या या सर्व 15 संशयितांचे मोबाईल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांची कसून तपासणी केली जात असून, त्यांचे शहजाद भट्टीच्या नेटवर्कशी असलेले डिजिटल धागेदोरे शोधण्यासाठी हे सर्व डिजिटल डिव्हाइसेस ची तपासणी करणे सुरू आहे. या नेटवर्कचा धोका पूर्णपणे नष्ट करण्यासाठी एटीएसचे चौकशी सत्र सुरू आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. दरम्यान, पालकांनी आपल्या मुलांच्या सोशल मीडियावरील हालचालींवर बारीक लक्ष ठेवावे, असे आवाहन सुरक्षा यंत्रणांनी केले आहे.
दरम्यान, महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) राज्याच्या सुरक्षेशी संबंधित मोठी मोहीम सुरू केली आहे. एटीएसच्या 14 युनिट्समधील 58 पथकांनी राज्यभरातील 102 ठिकाणी एकाच वेळी शोधमोहीम आणि चौकशी मोहीम राबवली. प्राथमिक तपासात शहजाद भट्टी आणि त्याचे काही साथीदार फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप यांसारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करून तरुणांशी संपर्क साधत होते. तपास यंत्रणांच्या मते, धार्मिक आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील मुद्द्यांचा वापर करून तरुणांवर प्रभाव टाकण्याचा आणि त्यांना राष्ट्रविरोधी विचारांकडे ढकलण्याचा प्रयत्न केला जात होता. ऑनलाइन प्रचार आणि वैयक्तिक संपर्क या दोन्हींचा वापर केला जातो.
बेरोजगार आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ तरुणांना सहज कमाई आणि अधिक पैशांचे आमिष दाखवून या नेटवर्कमध्ये ओढले जात असल्याचा संशय आहे. सुरक्षा यंत्रणांच्या मते, या व्यक्तींना स्लीपर सेल आणि स्थानिक एजंट म्हणून तयार करण्याची योजना असू शकते. गुप्त माहिती गोळा करणे, अंमली पदार्थांची तस्करी आणि अवैध शस्त्रपुरवठा यांसारख्या गंभीर प्रकरणांचाही तपास सुरू आहे.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, महाराष्ट्र एटीएसने नागरिक आणि पालकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. एजन्सीने त्यांना सोशल मीडियावर अनोळखी लोकांशी अनावश्यक संपर्क टाळण्याचे आणि संशयास्पद हालचालींची तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे. पालकांना त्यांच्या मुलांच्या इंटरनेटवरील हालचालींवर लक्ष ठेवण्याचा आणि त्यांच्या वागणुकीत कोणताही अचानक बदल दिसल्यास सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या