Husband killed over affair : मध्य प्रदेशातील सतना जिल्यातील रामपूर बघेलान पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या विपिन कुमार यादव (Vipin Kumar Yadav) प्रकरणाचा पोलिसांनी धक्कादायक उलगडा केला आहे. विपिनचा खून अन्य कोणी नसून त्याची पत्नी आंचल यादव हिने तिचा प्रियकर सुनील कुशवाहा याच्या मदतीने केल्याचे तपासात समोर आले आहे. विवाहापूर्वीपासून सुरू असलेल्या प्रेमसंबंधातून दोघांनी हा कट रचल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांच्या माहितीनुसार, नियोजनाप्रमाणे सुनील कुशवाहा याने त्याचा साथीदार संदीप बहरोलिया याच्या मदतीने विपिनला फिरायला जाण्याचे आमिष दाखवून सोबत नेले. त्यानंतर त्याची हत्या करण्यात आली. पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी सुरुवातीला मृतदेह एका विहिरीत फेकून दिला. मात्र पोलिसांचा तपास वेगाने सुरू झाल्याने संशय वाढू लागल्याचे लक्षात येताच त्यांनी मृतदेह विहिरीतून बाहेर काढून जमिनीत पुरून टाकला.
तपासादरम्यान पोलिसांनी कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संबंधित ठिकाणी उत्खनन केले. या कारवाईत जमिनीत पुरलेला मृतदेहाचा सांगाडा (कंकाल) जप्त करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी पत्नी आंचल यादव आणि तिचा प्रियकर सुनील कुशवाहा यांना अटक केली.
दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विपिन यादव हा 26 मार्च रोजी बेपत्ता झाला होता. त्याच्या वडिलांनी रामपूर बघेलान पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. गुमशुदगीच्या तपासादरम्यान पोलिसांना विपिनची पत्नी टीकर गावातील असल्याचे आणि त्याच गावातील एका व्यक्तीसोबत तिचे अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली.
या संशयावरून पोलिसांनी आंचल यादवला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान तिने खुनाची संपूर्ण कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली. न्यायालयाची परवानगी घेत मृतदेह बाहेर काढण्यासाठी उत्खनन करण्यात आले असून या कारवाईत मृतकाचा सांगाडा हाती लागला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.