Pune: मोशीत बचाव कार्यासाठी अत्याधुनिक यंत्राची मदत; 'एनडीआरएफ'कडून शर्थीचे प्रयत्न; आठ जणांचा शोध सुरू
esakal July 11, 2026 12:45 PM

पिंपरी: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोशीतील कचरा डेपोतील दुर्घटनाग्रस्त इमारतीचा काँक्रीट भाग फोडण्यासाठी अत्याधुनिक डेमॉलिशन एक्सकॅव्हेटर मशिन शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास घटनास्थळी आणण्यात आले. याद्वारे इमारतीचा अस्थिर भाग स्थिर करण्याचे आणि त्यात अडकलेल्या कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी मार्ग तयार करण्याचे काम राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाने (एनडीआरएफ) सुरू केले.

दरम्यान, बचाव कार्य जलद आणि काळजीपूर्वक करावे, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. बुधवारी दुपारी कचऱ्याचा ढिगारा (डोंगर) वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या एका इमारतीवर ढासळला. त्यामुळे इमारत कोसळून २३ जण अडकले होते. पाच जण स्वतः बाहेर आले. नऊ जणांची बचाव पथकाने सुटका केली.

Maharashtra Off-Budget Debt : महसुली तूट वाढली, महाराष्ट्रावर २८ हजार कोटींच्या कर्जाचा डोंगर; कॅगचा गंभीर इशारा

एकाचा मृतदेह गुरुवारी बाहेर काढण्यात आला. अद्याप आठ जण अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, इमारतीजवळचा कचरा हटवताना कचऱ्याचा ढीग खचतो आहे. त्यामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत. कचऱ्याच्या अतिदाबामुळे दुर्घटनाग्रस्त इमारत पूर्ण कोसळून त्याखाली आपत्तीग्रस्त व बचाव पथकातील जवान अडकण्याची शक्यता आहे. ते टाळण्यासाठी एनडीआरएफने मशिनचा वापर शुक्रवारी रात्री दहा पासून सुरू केला.

या दुर्घटनेतील दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या नगरसेविका सुलभा उबाळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी महापालिकेत आयुक्तांच्या कक्षाबाहेर धरणे आंदोलन केले. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उबाळे यांना फोन आला. त्यानंतर आंदोलन स्थगित केले. शिंदे यांनी त्यांना सांगितले की, ''इमारतीत अडकलेल्यांचा जीव वाचवणे महत्त्वाचे आहे. आता आयुक्त घटनास्थळी आहेत. दोषींवर कारवाई करा, असे त्यांना मी सांगितले आहे,’ त्यामुळे तुम्हीही सहकार्य करा.’ डॉ. सूर्यवंशी यांनी, दोषींवर कारवाई करणार असल्याचे पत्र उबाळेंना दिले.

Monsoon Update News : मान्सूनला अचानक ब्रेक ‘अल निनो’चा प्रभाव वाढला; शेतकऱ्यांसह सामान्य चिंतेत, राज्यात पाऊस पुन्हा कधी सक्रिय होणार? चौकशीअंती कार्यवाही

दरम्यान, या घटनेला तीन दिवस होऊनही पोलिस ठाण्यात ‘एफआयआर’ दाखल करण्यात आलेला नाही. याबाबत एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्‍याचे सहायक आयुक्‍त सुधाकर यादव यांनी सांगितले की, सर्व बाजूंनी चौकशी केल्‍यानंतरच पुढील कायदेशीर प्रक्रिया केली जाईल. या दुर्घटनेत एकाचा मृत्‍यू झाला असून, अकस्मात मृत्‍यूची नोंद केली आहे. कचऱ्याच्‍या दबावामुळे इमारत पडल्‍यामुळेच संबंधित व्‍यक्‍तीचा मृत्‍यू झाला, असे नमूद केले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.