Pune Water: पुण्याच्या पाणीपुरवठ्याचा २०४७ पर्यंतचा मास्टर प्लॅन; भविष्यातील टंचाई टाळण्यासाठी राज्य सरकारची मोठी तयारी
esakal July 12, 2026 08:45 PM

-प्रज्वल रामटेके

पुणे : पुणे आणि परिसराची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या आणि विस्तारत जाणारे शहर लक्षात घेता, भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी थेट २०४७ सालापर्यंतच्या पाण्याचे नियोजन केले जात आहे. राज्य सरकारच्या सूचनेनुसार जलसंपदा विभागाने एका ‘सर्वसमावेशक आराखड्यावर’ (मास्टर प्लॅन) वेगाने काम सुरू केले आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देतानाच सिंचनावरील ताण कमी करण्यासाठी नवीन पाण्याचे स्रोत शोधण्यावर या आराखड्यात भर दिला जात आहे, अशी माहिती पुणे पाटबंधारे मंडळातर्फे देण्यात आली आहे.

farmer Success Story: तळेगाव ढमढेरेच्या ११ महिन्यांच्या उसाला तब्बल ₹५,००० प्रतिटन बाजारभाव; हरियाणापर्यंत झाली विक्री, शेतीतून यशाची गोड कहाणी!

पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका, पीएमआरडीए, एमआयडीसी तसेच संपूर्ण पुणे महानगर क्षेत्राची २०४७ सालापर्यंतची पाण्याची गरज लक्षात घेऊन हा सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यात येत आहे. या आराखड्यात सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा सिंचनासाठी पुनर्वापर करता येऊ शकतो का, याचाही प्रामुख्याने विचार केला जात आहे. कृष्णा पाणी तंटा लवादातून मिळालेले वाढीव पाणी आणि हवामान बदलाचा प्रभाव यांचा एकत्रित अभ्यास करून भविष्यातील अतिरिक्त पाण्याचे स्रोत निश्चित केले जाणार आहेत.

यासंदर्भात पुणे पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे म्हणाले, ‘‘खडकवासला धरण प्रणालीची उभारणी मूळतः शेतीच्या सिंचनासाठी करण्यात आली होती. त्यावेळी शहरासाठी केवळ पाच टीएमसी पाणी राखीव होते. वाढत्या विस्तारामुळे अधिकृत पाणी आरक्षण आता १४ टीएमसीपर्यंत पोहोचले आहे. मात्र, प्रत्यक्षात शहरासाठी दरवर्षी सुमारे २२ टीएमसी पाण्याचा वापर होत आहे. यामुळे उपलब्ध पाण्याचा मोठा हिस्सा पिण्यासाठी खर्च होत असून, सिंचनासाठी उपलब्ध पाण्यावर ताण वाढत आहे. पाणी कमी झाल्याने दौंड, इंदापूर आणि इतर कालव्यांवरील सिंचन क्षेत्रावर त्याचा थेट परिणाम होत आहे. याच पार्श्वभूमीवर हा आराखडा निर्णायक ठरणार आहे.’’

खडकवासला भरले तरी पाण्याची चिंता कायमच

भविष्यातील हे नियोजन सुरू असतानाच, सध्या खडकवासला धरण भरल्याने पुण्याचा पाणीप्रश्न कायमचा सुटल्याच्या चर्चा समाजमाध्यमांवर सुरू आहेत. मात्र, हा समज चुकीचा असल्याचे कोल्हे यांनी स्पष्ट केले. खडकवासला हे प्रत्यक्षात एक ‘वितरण धरण’ असून, पुणे शहरासह दौंड आणि इंदापूर परिसराला याच धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, या धरणाची उपयुक्त साठवण क्षमता केवळ १.९७ टीएमसी असून ती संपूर्ण प्रणालीच्या केवळ सात टक्के इतकीच आहे. उर्वरित ९३ टक्के पाणी पानशेत, वरसगाव आणि टेमघर या वरच्या धरणांमध्ये साठवले जाते. त्यामुळे एका धरणाकडे पाहून पाणीस्थितीचे मूल्यांकन करणे योग्य नाही.

खडकवासला प्रणालीची एकूण उपयुक्त साठवण क्षमता २९.१५ टीएमसी आहे. सध्या या चारही धरणांमध्ये मिळून सुमारे ६० टक्के पाणीसाठा उपलब्ध असून, पुढील जलनियोजन उर्वरित मॉन्सूनवर अवलंबून राहणार आहे. चारही धरणे शंभर टक्के भरल्याशिवाय वर्षभराच्या पाणीसुरक्षेबाबत ठाम खात्री देता येणार नाही.

Milk Rate: दूध उत्पादकांना दिलासा! गायीच्या दुधाचा दर ४१ रुपयांवर; तुकाराम मुंढे इफेक्ट, राज्यातील संकलनात २० लाख लिटरची घट

‘‘पिण्याचे पाणी हा नागरिकांचा प्रथम हक्क आहे, ते द्यावेच लागेल. मात्र, सिंचनावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी आणि २०४७ पर्यंतच्या गरजा भागवण्यासाठी आम्ही नवीन स्रोतांचा शोध घेत आहोत. कोकणातील पाणी नदीजोड प्रकल्पातून आणता येईल का? किंवा कालव्यांची गळती रोखण्यासाठी ओपन कॅनॉलऐवजी पाईप डिस्ट्रिब्युशन सिस्टीम वापरणे, या सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत.’’

- प्रवीण कोल्हे, अधीक्षक अभियंता, पुणे पाटबंधारे मंडळ

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.