Palkhi Highway: पालखी महामार्गावर भीषण अपघात! भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; दोघांचा जागीच मृत्यू, एक गंभीर
esakal July 12, 2026 08:45 PM

लोणंद : लोणंद- फलटण पालखी महामार्गावर तरडगाव (ता. फलटण) गावच्या हद्दीत उड्डाण पुलाजवळ शनिवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास दुचाकीला मोटारीने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

farmer Success Story: तळेगाव ढमढेरेच्या ११ महिन्यांच्या उसाला तब्बल ₹५,००० प्रतिटन बाजारभाव; हरियाणापर्यंत झाली विक्री, शेतीतून यशाची गोड कहाणी!

राजेंद्र साहेबराव क्षीरसागर (वय ४०, रा. गोटेमाळ, लोणंद, ता. खंडाळा), अभिषेक धनंजय कणसे (वय २४, रा. शेरेचीवाडी, ता. फलटण) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत, तर अलंकार सूर्यकांत फडतरे (वय २४, रा. घाडगे कॉलनी, लोणंद) असे जखमीचे नाव आहे.

याबाबत लोणंद पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, येथील राजेंद्र क्षीरसागर, अभिषेक कणसे व अलंकार फडतरे हे काल रात्री विनानंबरच्‍या दुचाकीरून पालखी महामार्गावरून फलटण बाजूकडे निघाले होते. ते तरडगावच्या हद्दीत उड्डाण पुलाजवळ आल्यावर पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या मोटारीने (एमएच १२ झेडसी ६५२७) त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगात येऊन जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. त्यामध्ये दुचाकीवरील राजेंद्र क्षीरसागर आणि अभिषेक कणसे हे गंभीर दुखापत होऊन जागीच ठार झाले, तर अलंकार फडतरे गंभीर जखमी झाला. त्याच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हा अपघात इतका भीषण होता, की दुचाकीचा चक्काचूर झाला आहे, तर मोटारीचेही नुकसान झाले आहे. दरम्यान, मोटार चालक सचिन वसंत काशीद (रा. काशिदवाडी, ता. फलटण) याने त्याच्‍या ताब्यातील मोटार भरधाव वेगात, रस्त्याच्‍या परिस्‍थितीकडे दुर्लक्ष करून चालवून समोरच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने हा अपघात झाला. त्यामध्ये दोघे ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

Milk Rate: दूध उत्पादकांना दिलासा! गायीच्या दुधाचा दर ४१ रुपयांवर; तुकाराम मुंढे इफेक्ट, राज्यातील संकलनात २० लाख लिटरची घट

मोटार चालक सचिन काशीद हा जखमींना उपचारास न नेता अथवा अपघाताची माहिती लोणंद पोलिस ठाण्यात न देता घटनास्थळांवरून पळून गेला, असे संतोष साहेबराव क्षीरसागर (वय ४७, रा. गोटेमाळ) यांनी लोणंद पोलिसात दिलेल्‍या फिर्यादित म्हटले आहे. लोणंद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रोहित हेगडे अधिक तपास करत आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.