Mumbai Crime: मुंबईत पायधुनी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका 7 वर्षीय निष्पाप अल्पवयीन मुलीवर इमारतीच्या सुरक्षारक्षकाने (वॉचमन) बाथरूममध्ये घुसून लैंगिक अत्याचार केल्याची निंदनीय घटना घडली आहे. या पाशवी कृत्यानंतर संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून, संतप्त नागरिकांनी थेट पायधुनी पोलीस ठाण्याला वेढा घालत जोरदार निदर्शने केली.
या संपूर्ण प्रकरणी पायधुनी पोलिसांनी तत्काळ कायदेशीर पावले उचलत गुन्हा दाखल केला आहे. अत्याचार करणाऱ्या संबंधित नराधम सुरक्षारक्षकाला पोलिसांनी अटक केली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि घटनेची माहिती घेण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे पायधुनी पोलीस ठाण्यात पोहोचले. मात्र, तिथे उपस्थित असलेल्या संतप्त नागरिकांनी आणि नातेवाईकांनी राहुल नार्वेकर यांनाच घेराव घातला आणि जोरदार विरोध दर्शवला. "नराधम आरोपीला तत्काळ पोलीस स्टेशनमध्येच फाशी द्या" अशी संतप्त मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती, ज्यामुळे पोलीस ठाण्याच्या आवारात प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित 7 वर्षांची चिमुरडी इमारतीमधील वॉशरूमला गेली असताना, तिथे तैनात असलेल्या नराधम सुरक्षारक्षकाने आत प्रवेश केला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेत मुलगी गंभीर जखमी झाली असून, तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांच्या संतापाचा कडेलोट झाला. शेकडो नागरिकांनी एकत्र येत पायधुनी पोलीस ठाण्याला घेराव घातला. एवढेच नव्हे तर, संतप्त जमावाने पोलीस ठाण्यासमोरील मुख्य रस्ता अडवून धरत 'रास्तारोको' आंदोलन सुरू केले. यामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. पोलिसांनी संयमाने आंदोलक नागरिकांना बाजूला सारत आणि समजूत काढत रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी मोकळा केला. सध्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस ठाण्याबाहेर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
मुंबईसारख्या सुरक्षित मानल्या जाणाऱ्या शहरात सातत्याने महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या ताज्या घटनेने मुंबईतील महिला आणि बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा अत्यंत गंभीरपणे ऐरणीवर आणला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या