टीम इंडियाची यष्टीरक्षक आणि धडाकेबाज फलंदाज यास्तिका भाटियाने इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात एक अभूतपूर्व इतिहास रचला आहे. क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर तिची बॅट तळपली आणि तिने शतक झळकावलं. या शतकाची लॉर्ड्सच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद करण्यात येईल. कारण लॉर्ड्सच्या मैदानावर कसोटी शतक झळकावणारी ती जगातील पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (12 जुलै) इफ्सी वोंगच्या गोलंदाजीवर एक धाव घेत यास्तिकाने आपले हे पहिलेवहिले कसोटी शतक पूर्ण केले. खेळपट्टीला वाकून नमस्कार करत हा भावनिक क्षण यास्तिकाने साजरा केला. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे प्रतिष्ठित ‘लॉर्ड्स ऑनर्स बोर्ड’वर तिचे नाव कायमचे कोरले गेले आहे.
यास्तिकाने 158 चेंडूत 14 चौकारांच्या मदतीने 113 धावांची जबरदस्त खेळी केली. ती बाद होऊन माघारी परतताना लॉर्ड्सवरील तमाम क्रीडाप्रेमींनी उभे राहून तिला टाळ्यांच्या कडकडाटात मानवंदना दिली. यास्तिकाचे हे शतक केवळ तिच्या कारकिर्दीतील पहिले शतक नव्हते, तर हिंदुस्थानसाठी देखील एका नव्या विक्रमाची नोंद ठरणारं ठरलं. कसोटी सामन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या डावात हिंदुस्थानकडून सर्वोच्च धावसंख्या उभारणारी ती पहिली महिला खेळाडू ठरली आहे. तिने 1985 मध्ये संध्या अग्रवाल यांनी न्यूझीलंडविरुद्ध केलेल्या 98 धावांचा 41 वर्षे जुना विक्रम मोडीत काढला. या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर यास्तिकाने संध्या अग्रवाल, स्नेह राणा आणि गार्गी बॅनर्जी यांसारख्या दिग्गज हिंदुस्थानी खेळाडूंच्या पंक्तीत मानाचे स्थान मिळवले आहे.
यास्तिकाच्या या झुंजार आणि ऐतिहासिक शतकामुळे टीम इंडियाने या कसोटी सामन्यावर आपली पकड पूर्णपणे मजबूत केली आहे. पहिल्या डावात इंग्लंडला अवघ्या 170 धावांवर रोखल्यानंतर, टीम इंडियाने दुसऱ्या डावात उपकर्णधार स्मृती मानधनाच्या 70 धावा आणि यास्तिकाच्या शतकी खेळीच्या जोरावर 400 हून अधिक धावांची अवाढव्य आघाडी घेतली आहे. लॉर्ड्सच्या मैदानावर आपला पहिला ऐतिहासिक कसोटी विजय नोंदवण्यासाठी हिंदुस्थानचा महिला संघ आता अवघ्या काही पावले दूर आहे.





