थायलंडची राजधानी बँकॉकमधील नाइटपबमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीच 27 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 63 जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील 27 जणांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती मिळत आहे. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नाइट पबला नेमकी आग कशी लागली, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. आग लागल्याची माहिती मिळताच थायलंडचे पंतप्रधान अनुतिन चर्नविराकुल हे घटनास्थळी पोहोचले आहेत. त्यांनी आग लागणे आणि मृतांच्या आकडेवारीला दुजोरा दिला.
बँकॉकचे गर्व्हनरने सांगितलं की, चतुचक जिल्ह्यातील ‘रोंग बीयर ना लाट फ्राओ’ नावाच्या पबमध्ये ही आग लागल्याची घटना घडली आहे. हा शहरातील प्रसिद्ध पब आहे. या पबमध्ये नागरिकांची गर्दी असते. रविवारी रात्री ही घटना घडली. पबला आग लागल्यानंतर एकच धावाधाव झाली. अनेक जण जीव वाचवण्यासाठी टॉयलेटमध्ये लपले होते. त्यामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.
पबच्या मेन एन्ट्री गेटवरच आगीचे लोट
प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, पबच्या मेन एन्ट्री गेटपर्यंत धुराचे लोट पसरले. त्यानंतर काही क्षणात सर्वत्र आग पसरली. त्यामुळे बपच्या एन्ट्री गेटमधून बाहेर जाणं अवघड झालं होतं. आग लागल्यानंतर भीतीने लोक जीव वाचवण्यासाठी टॉयलेटमध्ये लपले होते. एन्ट्री गेटवर आग पसरल्याने बचावपथकाच्या जवानांना देखील पबमध्ये जाता आलं नाही. बचाव पथक पबमध्ये पोहोचले, तोपर्यंत अनेकांचा मृत्यू झाला होता. बहुतांश जणांचे मृतदेह पबच्या टॉयलेटमध्ये सापडले. अग्निशमन दलाच्या जवानांनी 30 मिनिटांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आलं.
तत्पूर्वी, थायलंडमध्ये याआधी आगीच्या भीषण दुर्घटना घडल्या आहेत. 2022 साली थायलंडच्या म्यूझिक पबमध्ये आग लागून 14 जणांचा मृत्यू झाला होता. तर देशातील आगीची सर्वात भीषण दुर्घटना 2009 साली बँकॉकच्या सांटिका नाइटक्लबमध्ये झाली होती. नव्या वर्षांच्या स्वागताला ही घटना घडली होती. या घटनेत 66 जणांचा मृत्यू झाला होता. तर 200 हून अधिक जण जखमी झाले होते. त्यानंतर बँकॉकमध्ये रविवारी आगीची दुर्घटना घडल्याने सोशल मीडियावर अनेकांनी 2009 सालच्या आगीच्या दुर्घटनेची आठवण काढली.