Nagpur Tiger Attack News : नागपूर जिल्ह्यातील देवलापार (Deolapar) परिसरात परिसरात वाघाच्या भीतीने (Tiger Attack) झालेल्या धावपळीत बंधाऱ्यात पडून पिता-पुत्राचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेत जीवन धर्मदास कोकोडे आणि त्यांचा मुलगा जतिन जीवन कोकोडे (वय 7) यांचा मृत्यू झालाय. या घटनेनं सर्वत्र शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. (Nagpur Tiger Attack News)
मिळालेल्या माहितीनुसार, जीवन कोकोडे हे मुलगा जतिन व मेहुणा संजय उईके यांच्यासह छवारी शिवारातील लखन बंधाऱ्याजवळील शेतात कामासाठी गेले होते. तिघेही शेतात काम करत असताना संजय उईके याला सुमारे 80 ते 100 मीटर अंतरावर पट्टेदार वाघ दिसला. त्याने आरडाओरड करताच तिघांनीही जीव वाचविण्यासाठी धाव घेतली. यावेळी संजय उईके हा बंधाऱ्याच्या खालच्या बाजूने पळाला, तर जीवन कोकोडे व त्यांचा मुलगा जतिन बंधाऱ्याच्या वरच्या दिशेने धावू लागले. धावत असताना जतिनचा पाय घसरून तो बंधाऱ्यात पडला. मुलाला वाचविण्यासाठी जीवन कोकोडे यांनी तत्काळ पाण्यात उडी घेतली. त्यांना पोहता येत असले तरी मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात व पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही खोल पाण्यात बुडाले. या दुर्दैवी घटनेत पिता-पुत्राचा मृत्यू झालाय.
Nagpur Tiger Attack News : वनविभागाने मृत पिता-पुत्राच्या वारसांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची नुकसानभरपाई
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच देवलापार पोलीस ठाण्याचे ठाणेदार नारायण तुरकुंडे तसेच वनपरीक्षेत्र अधिकारी शेषराव टुले हे आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बचाव व पंचनामा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या घटनेत वाघाच्या भीतीमुळे मृत्यू झाल्याचे लक्षात घेऊन वनविभागाने मृत पिता-पुत्राच्या वारसांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची नुकसानभरपाई जाहीर केली असून तातडीची मदत म्हणून 50 हजार रुपये देण्यात आले. मात्र या घटनेनंतर गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या