सत्ताधाऱ्यांचं पक्ष फोडाफोडीत लक्षं, इथे देशाचं नशीब फुटतंय; उद्धव ठाकरे यांची घणाघाती टीका, सोनम वांगचुक यांच्यासह विद्यार्थी आंदोलनाला दिला पाठिंबा
Marathi July 13, 2026 04:25 PM

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषद घेत दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या व सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी देशभरातील विरोधी पक्षांनी, सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांनी या आंदोलनाला पाठिंबा द्यावा असे आवाहन केले आहे. तसेच या आंदोलनाबाबत सरकारच्या उदासीनतेवरून उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. ”सत्ताधाऱ्यांचे राजकीय पक्षांच्या फोडफोडीत लक्ष आहे आणि इथे देशाचं नशीब फुटतंय”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

”हिंदुत्वाच्या नावावर जो लुटीचा कार्यक्रम सुरू आहे. त्याविरोधात मी गेल्या रविवारी रामरक्षा आंदोलन केलं. रामरक्षेचं पठण केलं. त्यानंतर हा कार्यक्रम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी होत आहे. 18 तारखेला मी स्वत: नागपूरला जाणार आहे. माझा प्रयत्न आहे की आता हिंदूंनी झोपून चालणार नाही. जागं झालं पाहिजे. आपल्या हिंदू धर्माचा दुरुपयोग करून लुटण्याचा कार्यक्रम कुणी करत असेल तर त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे. सध्या देशात फार विचित्र परिस्थिती आहे. बऱ्याच वर्षानंतर देशात आणि महाराष्ट्रात विरोधी पक्षाला बरंच काम आहे. जिथे बोट दाखवू तिथे भ्रष्टाचार चालला आहे. रस्त्यावर खड्डे आहेत आणि गडकरी साहेब इथेनॉलवर बोलतायत. त्यामुळे मी ठरवलंय की आता मी एक एका विषयावर बोलणार. दिल्लीतील जंतरमंतरवर देशातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या, युवकांच्या भविष्याचा विषय अभिजीत दीपके यांनी उचलला आहे. नीटचा पेपर फुटल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. सरकारला त्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. सत्ताधाऱ्यांचं पक्ष फोडाफोडीत लक्षं, इथे देशाचं नशीब फुटतंय”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

”दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला व सोनम वांगचूक यांना पूर्ण पाठिंबा द्यायला मी ही पत्रकार परिषद घेतली आहे. सोनम वांगचूक हे गेल्या महिन्यातच मला भेटून गेले. मला कायम त्यांच्याबद्दल आदर राहिलेला आहे. आपण सोनम वांगचूक यांच्या बुद्धीमत्तेचा देशासाठी फायदा करून घ्यायला पाहिजे. असे असताना आपल्या देशात अशा व्यक्तीला देशद्रोही ठरवून तुरुंगात टाकलं जातं. आज ती व्यक्ती आमरण उपोषणाला बसलीय, त्यांची तब्येत खालवत चालली आहे. चार दिवसांपूर्वी मी फोनवरून त्यांना विनंती केली होती की तुमच्यासारख्या व्यक्ती देशाला हव्या आहेत. सरकारला काही पडलेलं नाही. तुमच्यासारख्या व्यक्ती एक एक करून जात असतील तर सरकारला ते हवंच आहे. 2018 साली जेडी अगरवाल यांनी गंगेसाठी उपोषण केलं होतं. गंगेचा जो काही बट्ट्या बोळ झाला आहे. त्यासाठी उपोषण केलं, त्यांनी प्राण सोडले. कुणी त्याची दखल घेतली नाही”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

”अभिजीत दीपके हा युवक देशातील युवकांचा आवाज उठवतोय. हे युवक सुशिक्षित आहेत. 20 तारखेला त्यांनी मोर्चा आयोजित केला आहे. दीपके याने एक दावा केलाय की 20 तारखेच्या आता काही गुंड तिथे सोडून हिंसाचार माजवून हे आंदोलन उधळून लावण्याचा कांहीचा प्रयत्न आहे. हे अत्यंत हिनकस आहे. ते सर्व कुणासाठी लढतायत? देशातील सर्व तरुणांसोबत त्यांच्या पालकांनी देखील जागं व्हायला पाहिजे. उद्या अशी परिस्थिती आपल्यावरही येऊ शकते. हा विषय राजकीय नाही. हा देशाचा विषय आहे. त्यासाठी देशभर काही ना काही करायला हवे. प्रत्येक राजकीय पक्षाने आप आपल्या राज्यात काहीतरी केलं पाहिजे. जोपर्यंत देश जागा होत नाही तोपर्यंत बेफिकीर सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा कळणार नाही”, असा घणाघात देखील उद्धव ठाकरे यांनी केला.

”काय मागतायत सोनम वांगचूक? सरकार त्यांच्याशी बोलले का? अण्णा हजारे उपोषणाला बसेलेल तेव्हा सुषमा स्वराज यांनी तिथे जात भाषण केलं होतं. आता कुणी तिथे ढुंकून बघत नाही. एखाद्या व्यक्तीकडून काम नीट होत नसेल तर त्या व्यक्तीला बदलण्याची मागणी होत असेल, जर त्या व्यक्तीमुळे लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य बरबाद होत असेल तर त्या व्यक्तीला हटवण्यात कमीपणा काय? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.