Cemetery Wall Repair: 'सकाळ'च्या वृत्ताला प्रतिसाद; दावडी स्मशानभूमी भिंत दुरुस्तीला १० लाख मंजूर, आणखी निधीची ग्रामस्थांची मागणी
esakal July 13, 2026 10:45 PM

दावडी : दावडी (ता. खेड) येथील स्मशानभूमीची संरक्षक भिंत मुसळधार पावसामुळे कोसळल्याची बातमी ‘सकाळ’मध्ये (ता. ९) प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासन व लोकप्रतिनिधींनी तातडीने दखल घेतली. जिल्हा परिषद सदस्य विजयसिंह शिंदे यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे आमदार बाबाजीशेठ काळे यांच्या स्थानिक विकास निधीतून १० लाख रुपये मंजूर झाले असून संरक्षक भिंतीच्या पुनर्बांधणीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.

स्मशानभूमीची संरक्षक भिंत कोसळल्याने परिसरात सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र आता काम सुरू झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

दरम्यान, संपूर्ण संरक्षक भिंतीची पुनर्बांधणी दर्जेदार व कायमस्वरूपी करण्यासाठी मंजूर झालेला १० लाख रुपयांचा निधी अपुरा पडणार असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे. त्यामुळे आणखी १० लाख रुपयांचा निधी मंजूर करावा, अशी मागणी दावडीचे माजी सरपंच संभाजी घारे यांनी आमदार बाबाजीशेठ काळे यांच्याकडे केली आहे. यावेळी सरपंच राहुल कदम, भाऊसाहेब होरे आदी उपस्थित होते.

उर्वरित निधी लवकर मंजूर करून स्मशानभूमीच्या संरक्षक भिंतीचे काम पूर्णत्वास न्यावे, अशी अपेक्षाही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.