Pune Crime : बोपदेव घाट अत्याचार प्रकरण; आरोपी घाटात आल्यापासून ते कोणत्या मार्गाने पळून गेल्याची साक्ष नोंदवली
esakal July 14, 2026 01:45 AM

पुणे - बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणातील घटनास्थळ पंचांची साक्ष आज विशेष न्यायालयात नोंदविण्यात आली. बलात्कार करण्यापूर्वी तीनही आरोपी दुचाकीवरून बोपदेव घाटात कसे आले? व कोणत्या रस्त्याने पसार झाले, या सर्व जागा पंचनाम्यादरम्यान दाखविल्या असल्याची साक्ष पंचाने न्यायालयात नोंदविली. या जागांच्या पंचनाम्याचे चित्रीकरणही न्यायालयात सादर करण्यात आले.

विशेष सरकारी वकील एच. एम. भोसले यांच्या न्यायालयात तीनही आरोपींविरोधात आरोप निश्चिती करण्यात आली आहे. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी एकूण २५ साक्षीदारांची यादी न्यायालयात सादर केली आहे.

बोपदेव घाटात मित्रासमवेत फिरायला गेलेल्या तरुणी व तिच्या मित्राला तिघांनी कोयत्याचा धाक दाखवून तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना तीन ऑक्टोबर २०२४ ला घडली होती. गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार शोएब अख्तर उर्फ शोएब बाबू शेख (वय-२७, रा. आदर्शनगर, मंतरवाडी), चंद्रकुमार रविप्रसाद कनोजिया (वय-२०, रा. होलेवस्ती, उंड्री) आणि बाप्या उर्फ सोमनाथ उर्फ सूरज दशरथ गोसावी (वय-३३, रा. दीपनगर, काटेवाडी, ता. बारामती) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात असून, पाचशे पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले आहे.

मागील सुनावणीवेळी तरुणी व तिच्या मित्राची साक्ष नोंदविण्यात आली आहे. दोघांनीही आरोपींना न्यायालयात ओळखले. आरोपींनी तरुणी व तिच्या मित्राला लाकडी बांबूने मारहाण केली होती. हा बांबू पंचांसमक्ष हस्तगत करण्यात आला आहे. आरोपी शोएब अख्तर आणि चंद्रकुमार कनोजिया याने गुन्ह्याचे घटनास्थळ, बोपदेव घाटात कसे आले आणि गुन्हा केल्यानंतर कोणत्या मार्गाने पळून गेले, या सर्व जागा पंचनाम्यादरम्यान दाखविल्या. बचाव पक्षातर्फे मुख्य पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे ॲड. करीम जीवनी यांनी साक्षीदारांची उलटतपासणी नोंदवली. या प्रकरणाची दैनंदिन सुनावणी होणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.