Pune Zilla Parishad : जिल्हा परिषद सभागृहात महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न; अध्यक्ष वीरधवल जगदाळे संतप्त, सुरक्षा व्यवस्था कडक करण्याचे आदेश
esakal July 28, 2026 02:45 AM

पुणे : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेदरम्यान सोमवारी एका महिलेने सभागृहात ज्वलनशील पदार्थ स्वतःच्या अंगावर टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. सुरक्षा रक्षक आणि सेवकवर्गाने तत्काळ हस्तक्षेप करून महिलेच्या हातातील बाटली हिसकावून घेतल्याने अनर्थ टळला. या घटनेनंतर अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी खडे बोल सुनावत सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याचे निर्देश दिले.

जिल्हा परिषदेच्या चालू आर्थिक वर्षाच्या (२०२६-२७) पुरवणी अंदाजपत्रकावर चर्चा करण्यासाठी सोमवारी सर्वसाधारण सभा सुरू होती. सभा सुरू असताना अचानक ही महिला सभागृहात आली. तिने आरडाओरडा करत आत्मदहनाचा प्रयत्न केला. या अनपेक्षित प्रकारामुळे सभागृहात काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. काही महिला सदस्यांनी, सुरक्षा कर्मचारी आणि सेवकांनी तत्काळ धाव घेत महिलेला बाहेर घेऊन गेले. त्यानंतर या महिलेने माध्यमांशी संवाद साधला, त्यामध्ये एका जिल्हा परिषद सदस्यावर आरोप केले. या घटनेनंतर सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या सुरक्षा व्यवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ज्वलनशील पदार्थाची बाटली घेऊन एखादी व्यक्ती थेट सभागृहापर्यंत कशी पोहोचली, असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला. यावर अध्यक्ष जगदाळे यांनी आक्रमक होत, भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी प्रवेश व्यवस्था आणि तपासणी अधिक कडक करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, हे नेमके काय प्रकरण आहे, यावर सभागृहात कुठलीही चर्चा झाली नाही.

सभेच्या प्रारंभी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच अभिनंदन आणि शोकप्रस्ताव मंजूर करण्यात आले. त्यानंतर नीट परीक्षेत देशात मुलींमध्ये प्रथम क्रमांक मिळविलेल्या दौंड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी श्रावणी कुदळे हिचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर पुरवणी अंदाजपत्रकावरील कामकाज सुरू असतानाच हा प्रकार घडला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.