Khamgaon News : खामगावात पॅथॉलॉजीस्‍ट डॉक्‍टरचा संशयास्‍पद मृत्‍यू; शरीरावर आढळल्या जखमा
esakal July 14, 2026 01:45 AM

खामगाव - शहरातील सोनी पॅथॉलॉजीचे संचालक डॉ. गोपाल मुरलीधर सोनी यांचा संशयास्‍पद मृत्‍यू झाल्‍याची घटना ता. १२ जुलै रोजी दुपारी शेलोडी शिवारात घडली. याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलीसांनी आकस्‍मिक मृत्‍यूची नोंद केली आहे. दरम्‍यान, डॉ.सोनी यांच्या मृत्‍यूबाबत विविध चर्चा होत असून, पोलीसांनी तपासाची सुत्रे वेगाने हलविली आहेत.

मिळालेल्‍या माहितीनुसार, डॉ. गोपाल सोनी यांचे शेलोडी शिवारात शेत असून, रविवारी ते शेतात गेले होते. दरम्‍यान दुपारच्या सुमारास त्‍यांचा मृतदेह शेतात संशयास्‍पद स्‍थितीत आढळला. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी तात्‍काळ त्‍यांना डॉ. आशिष अग्रवाल यांच्या लाईफ लाईन रुग्‍णालयात दाखल केले. मात्र डॉक्‍टरांनी तपासणी करून त्‍यांना मृत घोषीत केले.

त्‍यानंतर मृतदेह शासकीय सामान्य रुग्‍णालयात नेण्यात आला व नातेवाईकांच्या तक्रारीवरुन खामगाव ग्रामीण पोलिस स्‍टेशनमध्ये मर्ग दाखल केला आहे. घटनेनंतर अनेकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला तर डॉ. सोनी यांच्या शरीरावर जखमा देखील असल्‍याचे आढळून आल्‍याने त्‍यांच्या मृत्‍यूबाबत शंकाकुशंका व्यक्‍त केल्‍या जात आहे. त्‍यानंतर सोमवारी अकोला येथील डॉक्‍टरांच्या विशेष चमुने त्‍यांच्या मृतदेहाचे शवविच्‍छेदन केले व तपासकामी नमुने घेतल्‍याची माहिती आहे.

तर या मृत्‍यूप्रकरणी संभाजी नगर येथून फॉरेन्‍सीक विभागाचे चमू सुध्दा तपासकामी खामगावात दाखल झाली होती. याप्रकरणात पोलीसांच्या हाती काही सुगावे लागल्‍याने आतापर्यंत पाच व्यक्‍तीची चौकशी करण्यात आल्‍याचे समजते. दरम्‍यान, शवविच्‍छेदन अहवालानंतरच या प्रकरणाचा उलगडा होणार आहे. या घटनेसंदर्भात १३ मिनिटाचा एक व्‍हिडीओ सोशल मीडियावर व्‍हायरल होत असल्‍याची चर्चा आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.