मंचर - मंचर-नारायणगाव जुन्या पुणे-नाशिक महामार्गावर मंचर येथील महात्मा गांधी विद्यालयासमोर एसटी बसच्या धडकेत झालेल्या भीषण अपघातात अकरावीतील विद्यार्थी वीर अनिल शिंदे (वय-१७, रा. अवसरी खुर्द) याचा मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत दुचाकीवर असलेले साहिल संदीप टेमकर व तेजस मंगेश भालेराव (दोघेही वय १७, रा. अवसरी खुर्द) हे गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे अवसरी खुर्द गावावर शोककळा पसरली आहे.
विशेष म्हणजे, रविवारी (ता. १२) वीरचा वाढदिवस कुटुंबीय व मित्रपरिवाराने उत्साहात साजरा केला होता. दीर्घायुष्याच्या शुभेच्छांचा वर्षाव होत असतानाच दुसऱ्याच दिवशी झालेल्या अपघाताने त्याचा दुर्दैवी अंत झाला.
तिघेही मित्र अवसरी खुर्द येथील भैरवनाथ विद्यालयातून दहावीमध्ये सुमारे ८५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले होते. नुकताच त्यांनी मंचर येथील महात्मा गांधी विद्यालयात विज्ञान शाखेच्या अकरावी वर्गात प्रवेश घेतला होता. विद्यालयातील हा त्यांचा चौथा दिवस होता. सोमवारी शाळा सुटल्यानंतर दुचाकीवरून(एमएच १२ केए ८०६८) ते मंचरच्या दिशेने येत असताना जुन्नर-कुर्ला एसटी बसची धडक बसून हा भीषण अपघात झाला.
अपघातानंतर वीरला तातडीने मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी घोडे व डॉ. प्रवीण देशमुख यांनी त्याला मृत घोषित केले. गंभीर जखमी साहिल टेमकर याला पुढील उपचारासाठी पुण्यात हलविण्यात आले असून तेजस भालेराव याच्यावर मंचर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, अपघातानंतर पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन जखमींची व ग्रामस्थांची विचारपूस केली. तसेच महात्मा गांधी विद्यालयासमोर तातडीने गतिरोधक उभारावेत आणि राष्ट्रीय महामार्गाऐवजी विद्यालय ते मंचर या जुन्या रस्त्याचा विद्यार्थ्यांच्या ये-जा करण्यासाठी वापर करण्याचे नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी विद्यालयाचे प्राचार्य नितीन बाणखेले यांना दिल्या.
या अपघाताचा पंचनामा मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार तानाजी हगवणे यांनी केला असून पुढील तपास सुरू आहे.