Electric Shock : आंबेगाव तालुक्यात घोडनदीत शेतीपंप जोडताना विजेचा धक्का; ३५ वर्षीय मजुराचा मृत्यू, एक जखमी
esakal July 14, 2026 08:45 PM

मंचर - मंचरपासून तीन किलोमीटर अंतरावर सुलतानपूर (ता. आंबेगाव) येथे घोडनदीपात्रात शेतीपंपाची मोटार बसविताना विजेचा धक्का लागून विलास विठ्ठल केदारी (वय-३५) या मजुराचा मृत्यू, तर त्याचा सहकारी किरकोळ जखमी झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (ता. १४) सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सुलतानपूर येथील घोडनदीपात्रात शेतकरी निलेश बबनराव बाणखेले यांच्या शेतीपंपाची मोटार आहे. आठवडाभरापूर्वी आलेल्या पुरामुळे अनेक शेतीपंप, केबल व विद्युत बॉक्सचे नुकसान झाले होते. पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतकरी पुन्हा मोटारी सुरू करण्याच्या कामाला लागले आहेत.

मंगळवारी (ता. १४) सकाळी विलास केदारी व संतोष लोभा केदारी (वय-३०, दोघे रा. दस्तुरवाडी, मंचर) हे मजूर मोटार बसविण्याचे काम करत होते. खबरदारी म्हणून शेतीपंपाचा फ्युज काढण्यात आला होता. मात्र, मोटार जोडणी सुरू असताना अचानक पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने विलास केदारी यांना जोरदार विजेचा धक्का बसला. ते पाण्यात फेकले गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत संतोष केदारी किरकोळ जखमी झाले.

घटनास्थळी सुमारे ५० हून अधिक शेतीपंप असून नेमक्या कोणत्या केबलमधून पाण्यात विद्युत प्रवाह उतरला, याचा शोध महावितरण आणि पोलिसांकडून घेतला जात आहे.

मयत विलास केदारी यांचा भाऊ गुलाब विठ्ठल केदारी यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिस कर्मचारी सुमित मोरे, अक्षय लंके तसेच कळंब महावितरणचे सहाय्यक अभियंता निखिल तिवारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

चार महिन्यांत चौथा बळी

'आंबेगाव तालुक्यात गेल्या चार महिन्यांत विजेचा धक्का लागून तीन शेतकरी आणि एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या पर्शिभूमीवर शेतकऱ्यांनी शेतीपंप सुरू करण्यापूर्वी वायरिंग, केबल आणि विद्युत जोडणीची काळजीपूर्वक तपासणी करावी. कोणतीही शंका असल्यास महावितरणशी तातडीने संपर्क साधून सुरक्षिततेची खात्री करूनच मोटार सुरू करावी, या बाबत गावोगावी जन जागृती होणे गरजेची आहे.'

- राहुल गवारे, कार्यकारी अभियंता, महावितरण विभाग मंचर

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.