बावधन - मोबाइल आणि टीव्हीच्या आहारी जाणाऱ्या आजच्या पिढीसमोर बावधनमधील अवघ्या चार वर्षांच्या दियान मनोज चौधरी याने प्रेरणादायी आदर्श घालून दिला आहे. वयाच्या चौथ्या वर्षी त्याने सातत्याने ऐतिहासिक सिंहगड किल्ल्यावर यशस्वी ट्रेक पूर्ण करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
दियान हा बावधनमधील एसएनबीपी स्कूलमध्ये ज्युनिअर केजीमध्ये (लहान गटात) शिक्षण घेत आहे. लहानपणापासूनच त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या आणि बालपणातील प्रेरणादायी गोष्टी ऐकायला मिळाल्याने त्याच्या मनात इतिहास, गड-किल्ले आणि शिवचरित्राविषयी विशेष आकर्षण निर्माण झाले. उन्हाळ्याच्या सुट्टीत त्याने स्वतःहून सिंहगडावर ट्रेक करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार आई-वडिलांनी पहाटे ४.४५ वाजता ट्रेकला सुरुवात केली. हा त्याच्या आयुष्यातील पहिलाच ट्रेक असला तरी कोणताही थकवा न जाणवता त्याने आत्मविश्वासाने संपूर्ण चढाई पूर्ण केली.
पहिल्या यशस्वी ट्रेकनंतर दियानची सिंहगडावरील ओढ अधिकच वाढली. उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रत्येक रविवारी पहाटे उठून सिंहगड चढणे हा त्याचा नित्यक्रम बनला. आता उन्हाळा असो वा पावसाळा, आई-वडिलांच्या मार्गदर्शनाखाली तो नियमितपणे सिंहगड ट्रेक पूर्ण करत आहे. नुकताच त्याने पावसाळ्यातील पहिला ट्रेकही यशस्वीरीत्या पूर्ण केला.
दियानने एवढ्या लहान वयात दाखविलेली जिद्द, शिस्त, इतिहासप्रेम आणि निसर्गाविषयीची आवड यामुळे तो अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. दियानच्या या प्रवासाचा आम्हाला अभिमान आहे. भविष्यातही त्याने इतिहासप्रेम, निसर्गप्रेम आणि धाडस जपत अनेक गड-किल्ले सर करावेत, अशी भावना त्याच्या आई-वडिलांनी व्यक्त केली आहे.