Double Decker Bus : बीआरटी, मेट्रो नसलेल्या मार्गांवर 'डबलडेकर'; २१ जुलैला होणार चाचणी
esakal July 15, 2026 03:45 AM

पुणे - पुण्यात पुन्हा एकदा डबलडेकर बसची चाचणी होणार आहे. ज्या मार्गावर बीआरटी व मेट्रो नाही अशा मार्गावर ‘डबलडेकर’ धावणार आहे. त्यामुळे चाचणीदेखील अशाच मार्गावर होणार आहे. मंगळवारी (ता. २१) पुण्यातील १० मार्गांवर या बसची चाचणी केली जाणार आहे. यात हडपसर-वाघोली व हडपसर-स्वारगेट या मार्गाचा समावेश केला आहे.

मुंबईतील बेस्ट प्रशासनाला डबलडेकर बस उपलब्ध करून दिलेल्या स्विच कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच पीएमपीच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. सोमवार (ता. २०) चाचणीसाठी एक बस उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. २१ जुलैपासून चाचणीला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. या वेळी पीएमपीच्या अधिकाऱ्यांसोबतच स्विच कंपनीचे अधिकारीदेखील उपस्थित असणार आहेत.

पुन्हा चाचणी का?

  • सप्टेंबर २५ मध्ये हिंजवडी भागात डबलडेकर बसची चाचणी झाली.

  • या मार्गात आता मेट्रो ३ धावणार आहे.

  • मेट्रोची सेवा सुरू झाल्यावर या भागात पीएमपीला प्रवाशांचा प्रतिसाद कमी लाभण्याची शक्यता.

  • शिवाय या चाचणीवेळी काही अडचणी आढळून आल्या.

  • परिणामी प्रशासनाने आता नव्या मार्गांची निवड केली.

डबलडेकर बसची नव्याने चाचणी घेतली जाणार आहे. ज्या भागात मेट्रो व बीआरटी नाही अशा भागात ही बस चालवली जाईल. त्यामुळे अशाच मार्गांवर डबलडेकरची चाचणी होणार आहे.

- महेश आव्हाड, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी, पुणे

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.