Pune Rain Update : पावसाची मुळशी, पवना धरण परिसरात आघाडी; टेमघर, वरसगावमध्ये कमी पर्जन्यमान
esakal July 15, 2026 03:45 AM

पुणे - पुणे जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात यंदा पावसाची स्थिती गतवर्षीपेक्षा बदललेली दिसत आहे. मुळशी, पवना आणि खडकवासला धरण परिसरात मंगळवारपर्यंत (ता. १४) गतवर्षीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. मात्र, टेमघर, वरसगाव आणि पानशेतमध्ये पर्जन्यमान अजूनही गतवर्षीच्या तुलनेत कमी आहे. पूर्व भागातील भिगवण, शेटफळ आणि रावणगाव परिसरात मात्र गतवर्षीपेक्षा अनेकपटीने अधिक पाऊस झाल्याचे जलसंपदा विभागाच्या आकडेवारीतून समोर आले आहे.

गतवर्षी मे महिन्यापासून मॉन्सून दाखल झाला असला तरी मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे मुळशी धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. १४ जुलैपर्यंत दोन हजार ७०३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, गतवर्षी याच कालावधीत दोन हजार ८७ मिलिमीटर पाऊस झाला होता. त्यामुळे या वर्षीचे पर्जन्यमान गतवर्षीच्या १२९.५२ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.

मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरातही एक हजार ४८५ मिलिमीटर पाऊस झाला असून, गतवर्षीच्या एक हजार ३१४ मिलिमीटरच्या तुलनेत तो ११३.०१ टक्के आहे. पुणे शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाच्या खडकवासला धरण परिसरातही या वर्षी ४१९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

मॉन्सूनमध्ये पश्चिमेकडील काही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याचे चित्र असले, तरी सर्वच धरणांना त्याचा समान फायदा झाला नसल्याचे जलसंपदा विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येते. दरम्यान, टेमघर, वरसगाव आणि पानशेत धरण परिसरात गतवर्षीच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे. धरण क्षेत्रांप्रमाणेच जिल्ह्याच्या पूर्व भागातही पावसाने लक्षणीय वाढ नोंदविली आहे.

गतवर्षी केवळ २६ मिलिमीटर पाऊस झालेल्या भिगवणमध्ये १८९ मिलिमीटर पाऊस झाला असून, हे प्रमाण ७२६.९२ टक्क्यांवर पोहोचले आहे. शेटफळ येथे गतवर्षीच्या ४९ मिलिमीटरच्या तुलनेत यंदा २९५ मिलिमीटर पाऊस झाला असून, ही वाढ ६०२.०४ टक्के आहे. रावणगावमध्ये गतवर्षी ३४ मिलिमीटर पाऊस झाला होता. यावेळी तेथे १२६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, हे प्रमाण ३७०.५९ टक्के आहे.

प्रमुख धरणांतील पर्जन्यमान (१४ जुलैपर्यंत)

धरण- यावर्षी (मि.मी.) - गतवर्षी (मि.मी.)

मुळशी - २,७०३ - २,०८७

पवना - १,४८५ - १,३१४

खडकवासला - ४१९ - ३९०

पानशेत - ९८५ - १,०८८

वरसगाव - ९५५ - १,०९७

टेमघर - १,२२५ - १,७२६

काही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अधिक पाऊस झाला आहे. त्यावरून भविष्यातील पाण्याची चिंता संपली, असा निष्कर्ष काढता येणार नाही. हवामान बदलामुळे पावसाच्या कालावधीतील आणि भौगोलिक वितरण असमान होत आहे. कमी कालावधीत अतिवृष्टी होत असल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून जाते तर पुढील काळात पाऊस कसा राहील, याची शाश्वती नसते. त्यामुळे पडणाऱ्या प्रत्येक थेंबाचे नियोजन, जलसाठ्याचे प्रभावी व्यवस्थापन आणि पाण्याचा काटकसरीने वापर करणे ही काळाची गरज आहे.

- प्रवीण कोल्हे, अधीक्षक अभियंता, पाटबंधारे मंडळ

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.