विशेष : डिझाइन, सादरीकरणाला कंटेंट निर्मितीची जोड
esakal July 15, 2026 11:45 AM

सीए प्रणव मंत्री, ‘एआय’ ट्रेनर

आजच्या डिजिटल युगात आकर्षक पोस्टर, सोशल मीडिया पोस्ट, प्रेझेंटेशन, व्हिडिओ किंवा निमंत्रण पत्रिका तयार करण्यासाठी ग्राफिक डिझायनरची गरज भासत असे. मात्र कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आता ही प्रक्रिया सर्वसामान्यांसाठीही सोपी झाली आहे. अशाच ‘एआय’आधारित प्लॅटफॉर्मपैकी एक म्हणजे ‘कॅनव्हा मॅजिक स्टुडिओ.’ काही शब्द लिहा आणि काही सेकंदांत पोस्टर, सादरीकरण, व्हिडिओ, फोटो एडिटिंग आणि सोशल मीडिया डिझाइन तयार करण्याची क्षमता या साधनामध्ये आहे.

कॅनव्हा मॅजिक स्टुडिओ म्हणजे काय?

कॅनव्हा हे जगभरात लोकप्रिय असलेले ऑनलाइन डिझाइन प्लॅटफॉर्म आहे. त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या ‘एआय’ सुविधांच्या संचाला डिझाइन स्टुडिओ असे म्हणतात. या सुविधांच्या मदतीने वापरकर्ता कोणतेही डिझाइन तांत्रिक कौशल्याशिवाय सहज तयार करू शकतो. विद्यार्थी, शिक्षक, चार्टर्ड अकाउंटंट, उद्योजक, दुकानदार, युट्यूबर, सोशल मीडिया क्रिएटर आणि अगदी गृहिणीदेखील याचा सहज वापर करू शकतात.

डिझाइन स्टुडिओमधील प्रमुख सुविधा

१. मॅजिक डिझाइन : फक्त ‘सीए सेमिनार ऑन टॅक्स’, ‘गणेश फेस्टिव्हल पोस्टर’ किंवा ‘गणेश फेस्टिव्हल पोस्टर’ असे लिहा आणि कॅनव्हा काही सेकंदांत अनेक आकर्षक डिझाइन तयार करून देते. यामुळे डिझाइन तयार करण्यासाठी तासनतास मेहनत करण्याची गरज राहत नाही.

२. मॅजिक राइट : लेखनासाठी ‘एआय’ सहाय्यक ः याच्या मदतीने आपण लेख, भाषण, लिंकडइन पोस्ट, इंस्टाग्राम कॅपशन, ई-मेल, जाहिरात, निमंत्रण अगदी काही सेकंदांत तयार करू शकतो.

मराठीसह अनेक भाषांमध्ये याचा उपयोग करता येतो.

३. मॅजिक एडिट : एखाद्या फोटोमध्ये बदल करायचा आहे?

उदा. लाल रंगाचा शर्ट निळा करणे, हातात फुलांचा गुच्छ देणे, पार्श्वभूमी बदलणे, टेबल काढून टाकणे आदी गोष्टी ‘एआय’च्या मदतीने करता येते.

४. मॅजिक इरेजर : फोटोमधील नको असलेली व्यक्ती किंवा वस्तू एका क्लिकमध्ये हटवता येते.

उदाहरणार्थ, पर्यटनस्थळी फोटो काढताना मागे आलेली व्यक्ती सहज हटवता येते.

५. बॅकराउंड रिमूव्हर : फोटोची पार्श्वभूमी काही सेकंदांत काढून टाकता येते.

याचा उपयोग पासपोर्ट फोटो, ई-कॉमर्स, उत्पादन जाहिराती, कंपनी प्रोफाइल यासाठी मोठ्या प्रमाणात होतो.

६. मॅजिक रिसाइज : एकाच डिझाइनला इंस्टाग्राम, फेसबुक, लिंकेडइन,व्हाट्सॲप, युट्युब थंबनेल या सर्व आकारांमध्ये एका क्लिकमध्ये बदलता येते.

७. एआय इमेज जनरेटर : फक्त मजकूर लिहा.

उदा.

‘सह्याद्री पर्वतरांगांमध्ये सूर्योदय’ आणि ‘एआय’ त्यानुसार नवीन चित्र तयार करते.

८. एआय प्रेझेंटेशन : फक्त विषय लिहा.

उदा. इन्कम टॅक्स माहिती

कॅनव्हा काही मिनिटांत आकर्षक प्रेझेंटेशन तयार करते.

९. एआय व्हिडिओ जनरेटर : स्क्रिप्ट दिल्यावर व्हिडिओ, ॲनिमेशन, ट्रान्झिशन्स, संगीत आपोआप तयार होते.

१०. ब्रँड कीट : कंपनीचा लोगो, फॉन्ट, कलर, ब्रँड आयडेंटिटी एकदाच सेव्ह केली की प्रत्येक डिझाइनमध्ये ती आपोआप वापरली जाते.

‘कॅनव्हा मॅजिक स्टुडिओ’ची मदत

वेबिनार पोस्टर, रजिस्ट्रेशन बॅनर, पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन, पार्टी रिसेप्शन, सोशल मीडिया पोस्ट, व्हाट्सॲप तयार करू शकतो. पूर्वी यासाठी वेगवेगळ्या सॉफ्टवेअरची आवश्यकता होती.

वापरताना घ्यावयाची काळजी

  • तयार केलेली माहिती पडताळून पाहावी.

  • कॉपीराइट नियमांचे पालन करावे.

  • दुसऱ्याच्या डिझाइनची हुबेहूब नक्कल करू नये.

  • व्यावसायिक वापरापूर्वी अंतिम गुणवत्ता तपासावी.

  • कॅनव्हा मॅजिक स्टुडिओ’चे फायदे

  • वापरण्यास अतिशय सोपे

  • तांत्रिक ज्ञानाची आवश्यकता नाही

  • हजारो टेम्प्लेट्स

  • वेळेची मोठी बचत

  • टीममध्ये एकत्र काम करता येते

  • मोबाईल आणि संगणक दोन्हीवर उपलब्ध

  • विद्यार्थ्यांपासून उद्योगांपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त

मर्यादा

  • सर्व ‘एआय’ सुविधा विनामूल्य उपलब्ध नाहीत.

  • काही प्रगत सुविधा ‘कॅनव्हा-प्रो’ मध्येच उपलब्ध आहेत.

  • एआय तयार केलेले डिझाइन अंतिम वापरापूर्वी तपासणे आवश्यक.

  • कॉपीराइट असलेल्या प्रतिमा किंवा लोगो वापरताना काळजी घ्यावी.

भविष्यातील शक्यता

आगामी काळात ‘एआय’ व्हिडिओ, थ्रीडी डिझाइन, स्वयंचलित ब्रँडिंग, ‘एआय’ व्हॉइसओव्हर आणि वैयक्तिकृत मार्केटिंग साहित्य तयार करण्याच्या सुविधा आणखी विकसित होतील. त्यामुळे डिझाइन क्षेत्रातील काम अधिक वेगवान आणि सर्वांसाठी सुलभ होईल.

निष्कर्ष

डिझाइन स्टुडिओ हे केवळ डिझाइन तयार करणारे साधन नाही, तर कल्पनांना व्यावसायिक स्वरूप देणारे सक्षम व्यासपीठ आहे. ‘एआय’ हे सहाय्यक साधन आहे; अंतिम कल्पकता, अचूकता आणि जबाबदारी ही माणसाचीच राहते, हे समजून घेतले पाहिजे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.