तळेगाव ढमढेरे - ता. निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथे ६० वर्षीय आईचा पोटच्या मुलाने मारहाण करून खून केल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. याबाबत शिक्रापूर पोलिसांनी मृत महिलेच्या मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस तपासानंतरच खुनाचे कारण उघडकीस येईल.
कुंदा रामोबा चौधरी (वय-६०, रा. निमगाव म्हाळुंगी, ता. शिरूर) यांचा त्यांच्या राहत्या घरी संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. याबाबत दिलीप रामोबा चौधरी याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात भास्कर दशरथ कबाडी (रा. कबाडवाडी, ता. जुन्नर) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
सविस्तर हकीगत अशी कि, १५ जुलै रोजी सायंकाळी आरोपी दिलीप रामोबा चौधरी याने आई कुंदा चौधरी यांना हाताने तसेच कठीण वस्तूने मारहाण करून गंभीर जखमी केले. या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात दिलीप रामोबा चौधरी याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गिरी पुढील तपास करीत आहेत. मृत कुंदा चौधरी यांच्यावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.