Kirtan Mahotsav : 'सकाळ'तर्फे मंगळवारपासून कीर्तन महोत्सव; चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजन
esakal July 16, 2026 03:45 AM

पिंपरी - आषाढी वारीनिमित्त ‘सकाळ माध्यम समूहा’ने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ कीर्तन महोत्सव आयोजित केला आहे. मंगळवारपासून (ता. २१) सुरू होणाऱ्या कीर्तन महोत्सवाचा समारोप आषाढी एकादशीच्या दिवशी अर्थात शनिवारी (ता. २५ जुलै) होणार आहे.

जगद्‍गुरू संत तुकाराम महाराज आणि संतशिरोमणी ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यांनी आषाढी वारीनिमित्त अनुक्रमे देहू आणि आळंदी येथून प्रस्थान ठेवले आहे. पिंपरी चिंचवड शहरातील भाविकांचा पाहुणचार घेऊन पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ झाले आहेत. त्यासोबत शहर परिसरातील अनेक दिंड्या आणि वारकरी भाविक पायी वारी करीत आहेत.

आपणही पंढरीची वारी करावी, भक्ती आणि श्रद्धेच्या वारी नावाच्या महासागरात आपणही सहभागी व्हावे, अशी अनेकांची मनोमन इच्छा असते. परंतु, नोकरी, व्यवसायानिमित्त, प्रकृतीच्या कारणास्तव अनेकांना इच्छा असूनही पंढरपूरला जाणे, भक्तीरसात न्हाऊन निघणे शक्य होत नाही.

अशा भाविकांसाठी ‘सकाळ माध्यम समूह’ दरवर्षी आषाढी वारीनिमित्त ‘नाचू कीर्तनाचे रंगी’ कीर्तन महोत्सव आयोजित करीत असतो. त्याला भाविकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. यावर्षीही हा भावभक्तीचा सोहळा आयोजित केला आहे. त्याला उपस्थिती लावून नामवंत कीर्तनकारांच्या वाणीतून निघणाऱ्या श्रवणभक्तीचा लाभ घ्यावा, भगवंताच्या नामस्मरणात सहभागी व्हावे, असे आवाहन ‘सकाळ’ने केले आहे.

सर्वांना विनामूल्य प्रवेश

आषाढी एकादशीनिमित्त ‘सकाळ’ने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात कीर्तन महोत्सव आयोजित केला आहे. सर्वांसाठी विनामूल्य प्रवेश आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.