पाली : रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या किल्ले सुधागड येथे नुकतेच एक अभूतपूर्व स्वच्छता अभियान राबविण्यात आले. दुर्ग श्री सुधागड मोहिमेचे सेवेकरी, स्थानिक दुर्ग श्री सरसगड संवर्धन संस्था, दुर्गरत्न प्रतिष्ठान आणि मुरुड येथील पद्मदुर्ग सेवेकरी यांच्या संयुक्त विद्यमाने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेमध्ये एकूण ४५ निष्ठावंत दुर्गप्रेमींनी एकत्र येत गडाच्या संवर्धनासाठी आपले अमूल्य श्रमदान केले.
भोर संस्थानाचा मुख्य आधारस्तंभ आणि संस्थानाचे कुलदैवत असलेल्या भोराई देवीचे स्थान म्हणून भोरपगड प्रसिद्ध आहे. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन पदस्पर्शाने या गडाचे नाव 'सुधागड' असे ठेवण्यात आले. स्वराज्याच्या वैभवाचा जिवंत साक्षीदार असलेल्या या गडावरील ऐतिहासिक राजवाड्याची सध्या अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. या वैभवशाली वास्तूची झालेली दुरवस्था पाहून गडावर पोहोचलेले दुर्गप्रेमी अत्यंत हळहळले. राजवाड्याच्या आवारात सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरले होते, ठिकठिकाणी शेणाचे ढिगारे साचले होते आणि अत्यंत दुर्दैवी बाब म्हणजे दोन वासरे सडलेल्या अवस्थेत मृत पावली होती. यामुळे तिथे प्रचंड दुर्गंधी पसरली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सर्व सेवेकऱ्यांनी कोणतीही दिरंगाई न करता तत्काळ कामाला सुरुवात केली. दुर्गम भागात जाणाऱ्या वाटांवरील झाडी-झुडपे आणि माती बाजूला सारून रस्ते मोकळे करण्यात आले. त्यानंतर राजवाड्यातील संपूर्ण कचरा आणि मृत जनावरांचे अवशेष सुरक्षितपणे हटविण्यात आले. अनेक तासांच्या अथक परिश्रमानंतर संपूर्ण राजवाडा स्वच्छ करण्यात आला.
या श्रमदानात युवक, युवती, महिला आणि ज्येष्ठ नागरिक अशा सर्व वयोगटातील नागरिकांनी अत्यंत उत्साहाने भाग घेतला. कोणताही गाजावाजा किंवा प्रसिद्धीची हाव न ठेवता, केवळ इतिहास रक्षणाच्या भावनेतून प्रत्येकाने स्वतःच्या हाताने घाण साफ केली. किल्ले हे आपल्या देशाच्या अस्मितेचे आणि गौरवशाली इतिहासाचे प्रतीक आहेत. त्यांचे जतन करणे ही केवळ शासनाची नाही तर प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी आहे, असा संदेश या मोहिमेतून देण्यात आला. या ४५ शिलेदारांनी दाखवलेली कर्तव्यनिष्ठा आणि दुर्गप्रेमाचा हा आदर्श आगामी काळात इतर दुर्गप्रेमींसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.
पवित्र्य आणि सौदर्य
केवळ स्वच्छता करून सेवेकरी थांबले नाहीत, तर त्यांनी पारंपरिक पद्धतीने संपूर्ण परिसर शेणाने स्वच्छ सारवून घेतला आणि त्यावर आकर्षक रांगोळी रेखाटली. यामुळे या ऐतिहासिक वास्तूचे पावित्र्य आणि सौंदर्य पुन्हा एकदा खुलून दिसू लागले.