Sarnath World Heritage Status: ज्या भूमीवरून भगवान बुद्धांनी दिला पहिला उपदेश, त्या ऐतिहासिक सारनाथचा युनेस्कोच्या यादीत समावेश
esakal July 26, 2026 01:45 PM

वाराणसी: बौद्ध धर्मातील अत्यंत महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असलेल्या सारनाथचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. कोरियातील बुसान येथे १९ ते २९ जुलैदरम्यान झालेल्या युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या ४८ व्या अधिवेशनात या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर पॅरिस येथील युनेस्को मुख्यालयातून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली.

भगवान बुद्धांच्या पहिल्या उपदेशाची पवित्र भूमी

बौद्ध धर्माच्या इतिहासात सारनाथला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. भगवान गौतम बुद्धांनी ज्ञानप्राप्तीनंतर आपल्या पहिल्या पाच शिष्यांना याच ठिकाणी प्रथम धर्मोपदेश दिला होता. बौद्ध परंपरेत या घटनेला 'धम्मचक्कप्पवत्तन' म्हणून ओळखले जाते. त्यामुळे जगभरातील बौद्ध भाविकांसाठी सारनाथ हे श्रद्धेचे प्रमुख केंद्र मानले जाते.

धम्मेक स्तूपासह अनेक ऐतिहासिक वारशांचे जतन

सारनाथमधील सम्राट अशोकाने इ.स.पूर्व तिसऱ्या शतकात उभारलेला धम्मेक स्तूप हे येथील प्रमुख आकर्षण आहे. याशिवाय चौखंडी स्तूप, सारनाथ पुरातत्त्व संग्रहालय आणि इतर प्राचीन बौद्ध अवशेष भारताच्या समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाची साक्ष देतात.

वाराणसीच्या जागतिक ओळखीला नवी भर

यापूर्वी वाराणसीला युनेस्कोकडून 'सिटी ऑफ म्युझिक' हा दर्जा मिळाला आहे. आता सारनाथचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाल्यामुळे वाराणसीची ओळख अधिक व्यापक झाली असून, बौद्ध पर्यटनाच्या जागतिक नकाशावर शहराचे महत्त्व आणखी वाढणार आहे.

Petrol Diesel Price Today : कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ ! पेट्रोल-डिझेलच्या दरातही बदल ? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे ताजे दर संरक्षणासाठी मिळणार अधिक बळ

जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाल्यामुळे सारनाथच्या संवर्धन आणि जतनाच्या कामांना अधिक गती मिळण्याची अपेक्षा आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (ASI) संस्थेला वारसा संवर्धन, संशोधन आणि पर्यटन सुविधांच्या विकासासाठी अधिक प्रभावीपणे काम करता येणार आहे.

मुख्यमंत्र्यांकडून आनंद व्यक्त

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सारनाथला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. या निर्णयामुळे वाराणसी आणि सारनाथमध्ये देश-विदेशातील पर्यटकांची संख्या वाढेल, स्थानिक पर्यटनाला चालना मिळेल आणि प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.