Comedian Raunak Rajani on CJP Protest Mumbai: नीट पेपर फुटी विरोधात दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीने (CJP PROTEST) केलेल्या आंदोलनानंतर देशभरात विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडलेलं. अनेक शहरांमध्ये विद्यार्थ्यांसह आंदोलक, सेलिबेटी, स्टँड अप कॉमेडियन उतरले होते. दिल्लीत आंदोलन पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. विद्यार्थ्यांसह आंदोलकांवर पाण्याचा मारा करण्यात आला. यात पोलीस आणि विद्यार्थी आंदोलकांमध्ये झालेल्या झटापटीत अनेकांची डोकी फुटली. अनेकांना मार लागला. दरम्यान, मुंबईच्या आंदोलनादरम्यानही विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली होती. यात एका लोकप्रिय स्टँडअप कॉमेडियनने मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत.आंदोलनावेळी पोलिसांनी स्टँडअप कॉमेडियन रौनक रजानीच्या( Raunak Rajani) पत्नीला लाथ मारल्यामुळे, तिच्या बरगड्या मोडल्याचं सांगत पोस्ट केलेल्या व्हिडीओची सध्या एकच चर्चा आहे. घडलेल्या घटनेचे काही Videoही त्याने पोस्ट केले आहेत, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
लोकप्रिय स्टँडअप कॉमेडियन रौनक रजानीने यांनी मुंबई पोलिसांनी आंदोलनावेळी पत्नी हिना मिर्चंदानी यांना लाथ मारली, ज्यामुळे त्यांच्या बरगड्या मोडल्याचा दावा केलाय.
AIBचा भाग राहिलेल्या रौनक रजानी पत्नीसह मुंबईतील शिवाजी पार्क येथे झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झाला होता. पोलिसांनी ताब्यात घेताना त्यांना धक्काबुक्की केली आणि पत्नीला लाथ मारली, त्यामुळे तिच्या बरगड्या मोडल्याचं तो म्हणालाय. हा संपूर्ण प्रकार त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओत मांडलाय. त्यासोबत काही पुरावेही दाखवले आहेत.
रौनक रजानीने इन्स्टाग्रामवर सुमारे पाच मिनिटांचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीलाच त्यांनी 22 जुलै रोजी घडलेल्या घटनेचा उल्लेख करत, आंदोलनादरम्यान पोलिसांच्या कथित मारहाणीमुळे त्यांच्या पत्नीच्या बरगड्या मोडल्याचा आरोप केला आहे. यासोबतच त्यांनी घटनेचे व्हिडीओ फुटेज आणि मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातील वैद्यकीय अहवालही दाखवला असून, त्यात बरगडीला दुखापत झाल्याचा उल्लेख त्याने केला आहे.
'माझ्या पत्नीला जबरदस्तीने पोलीस व्हॅनमध्ये बसवले'
व्हिडीओमध्ये रौनक रजानी म्हणाला, "आंदोलनादरम्यान मला आणि माझी पत्नी हिना हिला जबरदस्तीने पोलीस व्हॅनमध्ये बसवण्यात आले. मला मानेला दुखापत झाली, तर पत्नीच्या बरगडीजवळ तीव्र वेदना सुरू झाल्या. मुंबईतील आंदोलनादरम्यान एका पोलीस कर्मचाऱ्यामुळे माझ्या पत्नीची बरगडी मोडली. 22 जुलै 2026 रोजी शिवाजी पार्क येथे आंदोलन सुरू असताना पोलिसांनी अनेकांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेतले. त्यावेळी आम्हालाही ताब्यात घेण्यात आले. पोलीस व्हॅनमधील आमचे फोटो तुम्ही पाहिले असतील. आम्हाला जोराने ढकलून व्हॅनमध्ये टाकण्यात आले."असं तो म्हणाला.
View this post on Instagram
तो पुढे म्हणाला 'सुरुवातीला आम्ही याकडे फार लक्ष दिलं नाही. खरं सांगायचं तर, गेल्या आठवड्यात पोलिसांच्या कारवाईत अनेकांनी यापेक्षाही अधिक गंभीर त्रास सहन केला होता. त्यामुळे जे झालं ते झालं, असंच आम्हाला वाटलं. दुसऱ्या दिवशी आम्ही दिल्लीला गेलो. परत आल्यानंतरही तिच्या वेदना कमी झाल्या नाहीत. त्यामुळे आम्ही डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी एक्स-रे करण्याचा सल्ला दिला आणि त्यातून तिची बरगडी मोडल्याचे समोर आले.' असंही त्याने सांगितलं.
'माझ्या पत्नीला आणखी दुखापत होऊ नये, याची मी काळजी घेत होतो. म्हणून मी तिला माझा हात घट्ट पकडून ठेवायला सांगत होतो. पण त्याचवेळी एक पोलीस कर्मचारी व्हॅनमध्ये आला, त्याने माझ्या पत्नीला लाथ मारली आणि आमचे हात जबरदस्तीने वेगळे केले. हा व्हिडीओ पुन्हा नीट पाहा. त्याच्या पायाची हालचाल स्पष्ट दिसते ' असंही तो म्हणाला.