रामदास कदमांच्या मुलाने मुंबईतील लोकसभा मतदारसंघ हेरला, 2029 च्या निवडणुकीची तयारी, वडिलांच्या वाढदिवसाला बाईक अन् लॅपटॉप वाटले
एबीपी माझा वेब टीम July 27, 2026 07:43 PM

Siddhesh Kadam : शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदारकीबाबत हे मोठं वक्तव्य केलं आहे. सिद्धेश कदम यांनी खासदारकीबाबत इच्छा व्यक्त केली आहे. गोरेगाव नेस्को कार्यक्रमात माध्यमांसोबत संवाद साधताना कदम यांनी इच्छा व्यक्त केली आहे. भविष्यात डीलिमिटेशन झालं पक्षाने संधी दिल्ली तर दिल्लीत जायला आवडेल असंही सिद्धेश कदम म्हणाले. सिद्धेश कदम हे माजी मंत्री शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे पुत्र आहेत. 

सिद्धेश कदमांची उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभांमध्ये मोर्चेबांधणी सुरु

सध्या रविंद्र वायकर हे  उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. ते उत्तम काम करत आहेत. सध्या सिद्धेश कदम यांच्या माध्यमातून उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभांमध्ये मोर्चेबांधणी सुरु आहे. रामदास कदम यांच्या वाढदिवसानिमित्त गोरेगाव नेस्को मध्ये शासन आपल्या दारी या मोहिमेअंतर्गत 25 हजार लोकांना विविध शासकीय दाखल्यांचे वितरण करण्यात आले आहे. लोकसभा मतदारसंघातील दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच दुचाकी आणि लॅपटॉपचे वाटप देखील करण् यात आले. सिद्धेश कदम यांची मतदार संघातील बांधणी आणि कामे पाहता भविष्यात खासदार रवींद्र वायकर यांची उमेदवारी कापून उत्तर पश्चिम मध्ये निवडणूक लढण्याची तयारी असल्याचं बोललं जात आहे. रवींद्र वायकर यांना डावलून सिद्धेश कदम यांना उमेदवारी मिळणार का? हे पाहणे देखील महत्त्वाचं ठरणार आहे. 

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ 

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्र राज्यातील 48 मतदारसंघांपैकी एक महत्त्वाचा भाग आहे, ज्यामध्ये जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी आणि गोरेगाव क्षेत्रांचा समावेश होतो. सध्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व रवींद्र दत्ताराम वायकर हे करत आहेत. या जागेवर सिनेतारकांचे वर्चस्व राहिले आहे. या भागात गोरेगावमध्ये 520 एकरमध्ये पसरलेली फिल्म सिटी येते. या लोकसभा मतदारसंघात जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिम आणि अंधेरी पूर्व असे एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. मुंबईचे फुफ्फुस म्हणून ओळखले जाणारे 1800 एकरचे जंगलही याच लोकसभा जागेचा एक भाग आहे. येथील सुंदर समुद्रकिनारे पर्यटकांना खूप आकर्षित करतात, यामध्ये वर्सोवाचा समुद्रकिनारा देखील समाविष्ट आहे.

मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा इतिहास

1967 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मोठ्या सीमा बदलानंतर काँग्रेसचे उमेदवार शांतीलाल शाह मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. 1971 मध्येही ही जागा काँग्रेसकडेच राहिली आणि हरी रामचंद्र गोखले खासदार म्हणून निवडून आले. 1977 आणि 1980 च्या निवडणुकीत जनता दलाने ही जागा जिंकली होती. पक्षाचे उमेदवार आणि ज्येष्ठ वकील राम जेठमलानी दोनदा खासदार झाले. 1984 मध्ये चित्रपट अभिनेते सुनील दत्त यांनी काँग्रेस पक्षाकडून ही जागा लढवली होती. त्यांनी 1984, 1989 आणि 1991 मध्ये सलग तीन वेळा येथून निवडणूक जिंकली. 1996 च्या निवडणुकीत ही जागा शिवसेनेकडे गेली आणि पक्षाचे मधुकर सरपोतदार विजयी झाले. 1998 च्या निवडणुकीतही या जागेवर शिवसेनेचे मधुकर सरपोतदार निवडून आले होते.

 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.