Shalarth ID Scam : 841 बोगस शिक्षक अन् 160 कोटींची फसवणूक! शालार्थ घोटाळ्यात मोठा मासा गळाला; भाजप नेत्याच्या अटकेने खळबळ, संस्थाचालकाच्या फलटणमधून आवळल्या मुसक्या
esakal July 28, 2026 02:45 PM

जुने नाशिक : बनावट शालार्थ आदेशांच्या आधारे शासनाची सुमारे १६० कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक शहर पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) सोमवारी आणखी एक मोठी कारवाई केली. जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शेंदूर्णी येथील संजय गरुड या (Sanjay Garud detained in education scam) बड्या शिक्षण संस्थाचालकास एसआयटीने सातारा जिल्ह्यातील फलटण येथून ताब्यात घेतलं आहे.

संजय गरुड यांचा 30 जानेवारी 2024 रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश झाला होता. या प्रकरणी एक बडा मासा गळाला लागल्याने घोटाळ्याचे अनेक धागेदोरे उलगडणार आहेत.

जळगाव जिल्ह्यातील एका नामांकित शिक्षणसंस्थेच्या चालकाला गुन्हे शाखा युनिट-१ आणि एसआयटीच्या पथकाने जळगावातून चौकशीसाठी ताब्यात घेतलं असून, या बहुचर्चित घोटाळ्याच्या तपासाला आता वेग आला आहे.

या प्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, तपासादरम्यान नाशिक विभागातील नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांतील तब्बल ८४१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बनावट शालार्थ आदेशांच्या आधारे शालार्थ प्रणालीत नोंद करण्यात आल्याचे उघड झाले आहे. संबंधितांकडे वैध वैयक्तिक मान्यता किंवा शालार्थ प्रस्ताव नसतानाही त्यांना वेतन व थकबाकी अदा करण्यात आल्याने शासनाची सुमारे १६० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे.

Goa Casino Industry : गोव्यातील वादग्रस्त कॅसिनो आता महाराष्ट्राच्या सीमेवर? नव्या ठिकाणांचा सिंधुदुर्गात शोध, निवडणुकीआधी भाजप सरकारवर मोठा दबाव!

या घोटाळ्यात आतापर्यंत सुमारे १,२०० संशयितांची नावे समोर आली असून, तपासाची व्याप्ती सातत्याने वाढत आहे. शुक्रवारी (ता. २४) धुळे येथील सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांत झालेली ही दुसरी मोठी कारवाई मानली जात आहे. ताब्यात घेतलेल्या शिक्षणसंस्थाचालकाला अद्याप अटक करण्यात आलेली नसून, त्यांचा या प्रकरणाशी नेमका काय संबंध आहे, याबाबत एसआयटीकडून सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मंगळवारी (ता. २८) त्यांना नाशिकमध्ये चौकशीसाठी आणले जाण्याची शक्यता असून, त्यानंतर पुढील कारवाईबाबत स्पष्टता येणार आहे.

Nitin Gadkari Deepfake Row : एक्स, मेटा अन् गुगलवर होणार कारवाई? E20 पेट्रोल वादात नाव ओढल्याने मंत्री नितीन गडकरी कोर्टात; जाणून घ्या काय आहे प्रकरण कारागृहात रवानगी

तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर (६७) यांना सोमवारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्यांची नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. धुळे येथून सेवानिवृत्त झालेले हिंगोणीकर यांना ‘एसआयटी’ ने शनिवारी अटक केली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. तपासादरम्यान, हिंगोणीकर यांनी २०११ ते २०१५ या कालावधीत जळगाव जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असताना तब्बल २५९ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना स्वतःच्या स्वाक्षरीने बनावट शालार्थ आयडी मंजूर केल्याचे निष्पन्न झाल्याचा दावा ‘एसआयटी’ ने केला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.