संसदेच्या पावसाळी अधिवेशनात कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात झालेल्या लाठीचार्जवरून गदारोळ सुरू आहेत. काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांनी या मुद्द्यावरून सरकारला थेट सवाल केले आहेत. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करायला ते दहशतवादी आहेत का? लाठीचार्जचे आदेश कुणी दिले? पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी याबाबत उत्तर द्यायला हवं. हा प्रश्न केवळ काँग्रेस नव्हे तर संपूर्ण देशातील जनता विचारत असल्याचेही गांधी यांनी म्हटले. त्यांनी नेमकं काय म्हटले ते सविस्तर जाणून घेऊयात.
काय म्हणाल्या प्रियंका गांधी?प्रियंका गांधी म्हणाल्या, ‘आम्ही आरएमएल रुग्णालयात गेलो होतो, जिथे जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. आमच्या काही वेळ आधीच केंद्रीय आरोग्यमंत्रीही तेथे जाऊन गेले होते. आम्ही पोहोचलो तेव्हा त्या जखमी मुलीची आई नेत्यांच्या येण्या-जाण्यामुळे संतप्त झाली होती. तिने आम्हाला सांगितले, तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद, पण आम्हाला आता कोणालाही भेटायचे नाही.’
विद्यार्थी दहशतवादी होते का?पुढे बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, ‘ती आई प्रचंड वेदनेत होती. तिचे संपूर्ण शरीर थरथरत होते. तरीही ती म्हणाली, ज्यांनी माझ्या मुलीची ही अवस्था केली, त्यांनीही इथे यावे. माझ्या मुलीचा बळी गेला आहे. तिच्यासोबत काहीही झाले तरी मी लढत राहीन. कदाचित मला ही गोष्ट इथे उभे राहून सर्वांसमोर सांगायला नको होती. पण त्या आईच्या तुटलेल्या हृदयाचा आवाज ऐकून, तिची परवानगी न घेता मी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना विचारू इच्छिते की, विद्यार्थ्यांवर अश्रुधुराच्या नळकांड्या का फोडल्या? लाठीमार का करण्यात आला? मुलींचे कपडे का फाडले गेले? त्यांचा अपमान का करण्यात आला? ते दहशतवादी होते का? याचे उत्तर द्या.’
आपण जनतेचे सेवकपुढे सरकारला सवाल करताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, ‘काँग्रेस हा प्रश्न विचारत आहे आणि उत्तर मागत आहे. उत्तर द्या. पॅलेट गन चालवण्याचा आदेश कोणी दिला? पंतप्रधानांनी दिला की गृहमंत्र्यांनी? हा प्रश्न केवळ काँग्रेस पक्षाचा नाही, तर संपूर्ण देशाचा आहे. त्यामुळे उत्तर देणे ही तुमची जबाबदारी आहे. तुम्ही तरुणांपासून आणि त्यांच्या आवाजापासून इतके का घाबरता? हे संसद भवन देशाची अमानत आहे, कोणाचीही खासगी मालमत्ता नाही. आपण सर्वजण जनतेचे सेवक आहोत, त्यांचे प्रतिनिधी आहोत. ही सत्ता देखील जनतेनेच तुम्हाला दिली आहे.’